शुभम बायस्कार
अमरावतीत खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला खुद्द व्यवस्थापकानेच शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ स्थित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या गोल्डन फायबर या कंपनीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीच्या नांदगाव पेठ स्थित गोल्डन फायबर या कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक जाँनसिह रावत याच्याविरूद्ध नांदगावपेठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी जाँनसिह रावत विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कंपनीतच महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 22 जून 2024 रोजी फिर्यादी महिला ही गोल्डन फायबर कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, फिर्यादी महिलेने तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी तत्काळ आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे ही सांगितले. तर नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे म्हणाले की, हा संपूर्ण प्रकार 22 जून 2024 मधील असल्याने याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या पुर्वी ही व्यवस्थापक जाँनसिह रावत विरूद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्या मोघम स्वरूपातील असल्याने त्यामध्ये पोलिसांना ठोस कार्यवाही करत आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिडीत महिला कामावर होती. त्यावेळी तिला त्रास होत होता. याची माहिती तिने आरोपी रावत याला दिली. रावत याने त्याच वेळी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तसं केल्यास तुला बरं वाटेल असंही तो तिला म्हणाला. याने त्या महिलेला धक्का बसला. तिला चक्कर आली. ती घाबरून गेली. त्या वेळी कामावर असलेले काही जण तिच्या मदतीला आले. तिने झालेला प्रकार सर्वांना सांगितला. नोकरी जाईल म्हणून अनेक लोकांनी तक्रार केल्या नव्हत्या. मात्र या महिलेने तक्रार देण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
12 जानेवारी 2025 रोजी गोल्डन फायबर कंपनीत 100 पेक्षा अधिक महिला कामगारांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. कंपनीतील अन्न किंवा पाण्यातून ही विषबाधा झाल्याचे सांगितले जात होत. मोठ्या प्रमाणात कंपनीत कामगारांना विषबाधा झाल्याच्या घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली होती. या घटनेतील विषबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व काही रुग्णांवर खासगीमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेनंतर पहिल्यांदाच गोल्डन फायबर कंपनी ही चर्चेत आली होती. त्यानंतर 13 जानेवारीला कंपनीतील शेकडो महिला कामगारांनी कंपनीबाहेर ठिय्या आंदोलन करत कंपनीचे व्यवस्थापक जॉनसिंह रावत विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती.