प्रेमासाठी काहीही! 'क्राईम पेट्रोल'मधील पोलीस झाली आरोपी, अभिनेत्रीने असा आखला बनाव

प्रेमसंबंधातून या अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वसई:

वसईमध्ये प्रेमसंबंधात (Vasai News) अडथळा आणणाऱ्या प्रियकराच्या भावाला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मुलाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी अवघ्या 4 तासात वेगाने तपास करून अपहरण झालेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. प्रेमसंबंधात चिमुकल्याच्या पालकांचा अडथळा येत असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी एका तरूणीने चिमुकल्याचं अपहरण केलं होतं. साबरीन शेख (22) असं अपहरण करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. 

विशेष म्हणजे ही तरुणी ‘क्राईम पेट्रोल' या टीव्ही मालिकेसह इतरही काही मालिकांमध्ये सहकलाकार म्हणून काम करते. साबरीन शेखचे बृजेश गौतम या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र बृजेशचा भाऊ दिनेश गौतम आणि त्याच्या पत्नीचा या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यामुळे बृजेश हा सबरीनपासून दुरावला होता. याचा बदला घेण्यासाठी, दिनेश गौतम आणि त्याच्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी सबरीनने त्यांच्या मुलाचं अपहरण केलं, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. 

नक्की वाचा - आरती सुरू असताना विहिरीतच मंदिर कोसळलं, कोल्हापुरात पुजाऱ्याचा दुर्देवी अंत

वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे दिनेश गौतम (34) हा पत्नी प्रीती आणि ३ मुलांसह राहत होता. शनिवारी नेहमीप्रमाणे गौतम यांचा 3 वर्षांचा मुलगा प्रिन्स खाजगी शिकवणीसाठी गेला होता. त्यावेळी ही तरुणी तिथे गेली. प्रिन्सला औषध देण्यासाठी त्याच्या आईने घरी बोलावल्याचं सांगून प्रिन्सला क्लासमधून घेऊन फरार झाली. बराच वेळ झाला तरी प्रिन्स घरी आला नव्हता. पुढील काही वेळातच हा अपहरणाचा प्रकार असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यांनी याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांची वेगवेगळी पथक बनवली. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी तरुणीचा शोध सुरू केला. यावेळी प्रिन्सच्या ट्युशन क्लास  परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी साबरीन शेख (22) ही महिला मुलाला घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी सीसीसीटीव्हीचा माग काढत आरोपी साबरीन शेख हिला वांद्रे येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता तिने अपहरणाची कबुली दिली. प्रिन्सला तिने नायगाव येथील एका नातेवाईकाकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्रिन्सची सुखरूप सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले.

Topics mentioned in this article