भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
Cyber Crime : सायबर क्राइमच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच मुंबईतील एका तरुणाला गुगलवर सर्च केल्याचा मोठा फटका बसला आहे. 'गुगल'द्वारे कॉल गर्लचा शोध घेणे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याला महागात पडले आहे. सायबर भामट्याने तरुणाकडून तब्बल सहा लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. तरुणाने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सायबर भामट्याने त्याला जाळ्यात ओढून पोलिसांची तसेच बदनामीची भीती घालून एकूण सहा लाख रुपये उकळले. तक्रारदार विद्यार्थी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत रिसर्च ट्रेनी म्हणून काम करतो.
नक्की वाचा - Crime News: पिंपरीतील तरूणीच्या हत्येचं गुढ उकललं, आर्थिक व्यवहार अन् संबंधातून शेजाऱ्यानेच संपवलं
4 एप्रिलला त्याने 'गुगल'द्वारे एस्कॉर्ट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची शोधाशोध सुरू केली. एका संकेतस्थळावर त्याला एक व्हॉट्सअॅप क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधून सेवेची मागणी करताच तीन हजार रुपयांना व्यवहार ठरला. विद्यार्थी जाळ्यात येताच त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात झाली. आरोपींनी सुरुवातीला तीन हजार रुपये घेतल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट, इन्शुरन्स, प्रोसेसिंग फी, पोलीस पडताळणी आणि जीएसटीच्या निमित्ताने सहा लाख रुपये उकळले.
विद्यार्थ्याने पैसे देण्यास नकार देताच सायबर भामट्यांनी पोलिसांना सांगून बदनामीची भीती घातली. याच भीतीला बळी पडून त्याने पैसे भरले. अखेर, आणखी पैशांची मागणी झाल्याने त्याला संशय आला. त्यानंतर तरुणाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.