नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली असून दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेल्या 11 वर्षांपासून या निकालाची प्रतीक्षा होती. अखेर आज यावर निकाल जाहीर करण्यात आला असला तरी दाभोलकर खूनाच्या सूत्रधाराला शिक्षा दिली नसल्याने अंनिसचे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.
या प्रकरणात नरेंद्र दाभोलकर यांची मुलं हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालय आणि पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार असल्याचं सांगितलं आहे. हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाने प्रत्यक्षात गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींनी सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली याबद्दल दिलासा व्यक्त केला. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार आणि दाभोलकर यांच्यासह गौरी लंकेश, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या आरोपींना शिक्षा होणं आवश्यक असल्याची भावना मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली. गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्याकांडासह नालासोपाऱ्यातील बॉम्बहल्ला प्रकरणाच्या खटल्याचे निकाल अपेक्षित आहे. हा निकाल समोर आल्यानंतर व्यापक कट समोर येईल असंही हमीद दाभोलकर म्हणाले.
नक्की वाचा - Explainer : दाभोलकर हत्याकांडाचा आज निकाल; गेल्या 11 वर्षात काय काय घडलं?
दाभोलकरांची बाजू मांडणारे वकील वीरेंद्र इंचलकरंजीकर यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्दे मांडले. दाभोलकर हत्या प्रकरणात 72 साक्षीदारांची यादी असताना प्रत्यक्षात मात्र 20 जणांची साक्ष घेण्यात आली. महत्त्वाच्या साक्षीदारांना बोलावण्यात आलं नसल्याचा आरोप इंचलकरंजीकरांनी यावेळी केला. त्यामुळे या निकालाला उच्च न्यायालयात चॅलेंज करणार असल्याचं वकिलांनी सांगितलं.