
राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ambergris Seizure : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कस्टम विभागाने गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर 4 किलो 140 ग्रॅम वजनाची दुर्मिळ व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंबरग्रीसची किंमत 5.45 कोटी रुपये इतकी असल्याचे कस्टम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
कस्टम विभागाला बुधवारी (12 ऑगस्ट) गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, पांढऱ्या समुद्रकिनारी एका हलक्या तपकिरी रंगाचा आणि अत्यंत चिकट जेलीसारखा गोळा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक (पी अँड आय) अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक (हर्णे) विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
( नक्की वाचा : Acid Attack : अमरावतीमध्ये MPSC चा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला, भावानं व्यक्त केला वेगळाच संशय )
कस्टम विभागाच्या या जलद कारवाईमुळे 4 किलो 140 ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले. औषधनिर्मितीमध्ये या अंबरग्रीसचा वापर होत असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही व्हेल माशाची उलटी समुद्रकिनारी कशी पोहोचली, यात कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world