Ganesh Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट; मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 3 बालकांचा मृत्यू

महाराष्ट्रात गणेश विसर्जनाला गालबोल लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्रात गणेश विसर्जनाला (Ganesh Visarjan) गालबोल लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इंदापूर तालुक्यात विसर्जनावेळी एका 16 वर्षांच्या मुलाचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दुसरीकडे धुळे शहरालगत चितोड गावात गणपती मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला. देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक जड अंत:करणाने बाप्पाला निरोप देत असताना राज्यातून हळहळ करणारी घटना घडली आहे.  

धुळे शहरालगत (Dhule News) असलेल्या चितोड गावात गणपती मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चितोड गावातील एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीचा ट्रॅक्टर भाविकांच्या अंगावर गेला. ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. तीन लहान बालके ट्रॅक्टरखाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहा जणं जखमी तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये गणेशाची मूर्ती ठेवून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी अचानक ट्रॅक्टरवरुन ताबा सुटल्याने मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या गर्दीत ट्रॅक्टर शिरला. त्यामुळे चाकाखाली आल्यामुळे परी बागुल (वय 13), शेरा सोनावणे (वय 6), लड्डू पावरा (वय 3) या बालकांचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Khuni Ganpati : मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन; काय आहे धुळ्यातील 'खुनी गणपती'चा इतिहास?

पुण्याच्या इंदापूरमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे. इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर गावात नीरा नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेला 16 वर्षीय तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत कुलकर्णी असं या मुलाचं नाव असून रेस्क्यू टीमकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी गावकरी आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन दाखल असून होडीच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. दुपारी तीन वाजता निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली. तीन वाजल्यापासून त्याचा शोध घेतला जात आहे. अनिकेत हा मागील नऊ वर्षापासून इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नरसिंह वेदपाठ शाळेमध्ये शिकत होता. तो मुळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील हांडुग्री गावचा रहिवासी आहे.