
धुळे शहरातील अवधान एमआयडीसीतील सोलर फिल्म बनवणाऱ्या कंपनीने चक्क हाँगकाँग येथील फायनान्स कंपनीला तब्बल 3 कोटी 12 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी धुळे शहरात राहणाऱ्या कंपनीच्या 9 संचालकांविरोधात मोहाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दक्षिण कोरियाकडून येणाऱ्या कंपनीने कच्चा माल खराब दिल्याचे खापर संबंधित संचालकांनी फोडले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंदूर येथील मनीष गोविंद शर्मा यांनी याबाबत तक्रार दिली आहे . अवधान एमआयडीसीतील सनलिंग फोटो व्होल्टिक प्रा.लि. या कंपनीने उत्पादनासाठी कर्ज घेतले होते. सनलिंग कंपनीत तयार होणाऱ्या सोलर फिल्म बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घेण्यासाठी हे कर्ज घेतले होते. त्यामुळे हाँगकाँगच्या वित्त कंपनीने सनलिंगचे संचालक रामचंद्र नारायण अग्रवाल यांच्यावर विश्वास ठेऊन 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर कर्ज दिले. भारतीय बाजारभावाप्रमाणे कर्जाची ही रक्कम 03 कोटी 12 लाख 4 हजार 431 रुपये एवढी आहे.
रामचंद्र अग्रवाल यांनी दक्षिण कोरियाच्या बाजारातून विकत घेतलेला प्लास्टिकचा कच्चा माल खराब निघाल्याने नुकसान झाल्याचा बनाव तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच्याशी हाँगकाँगच्या कंपनीचा काही संबंध नसताना संचालक रामचंद्र अग्रवाल यांनी 3 कोटी 12 लाख 4 हजार 431 रुपयांची फसवणूक केली आहे. त्यासाठी त्यांना त्यांचा भाऊ हनुमानप्रसाद नारायण अग्रवाल आणि अन्य लोकांनी मदत केल्याची तक्रार मनीष शर्मा यांनी दिली आहे.
त्यावरून मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता तो गुन्हा धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत आता तपास सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक अमोल देवढे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात नक्की काय झालं आहे याचा तपास पोलीस घेत आहे. शिवाय कर्ज हे थेट हाँगकाँग स्थित वित्त कंपनीकडून घेतले असल्याने चौकशी दरम्यान काही अडचणी येवू शकतात का याचीही पडताळणी पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world