- पिंपळनेर बसस्थानक परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे
- पकडलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना चोप देण्यात आला.
- परिसरातील नागरिकांनी रोडरोमिओंविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
नागिंद मोरे
पिंपळनेर शहरात मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. पिंपळनेर बसस्थानक परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडून चोप देण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नागरिकांनी या रोडरोमिओं विरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच एका शाळकरी मुलीची छेड काढण्यात आली होती. छेड काढल्यानंतर आरोपी फरार झाला होता. हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा दुसरी छेड काढण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दामिनी पथकाच्या गस्तीचा वचक नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. बसस्थानक परिसरात मुलींची सर्रास छेड काढली जाते. यावेळी अशीच घटना घडली. त्यामुळे सतर्क नागरिकांनी याची माहिती पोलीसांनी दिली.
ही माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने बस स्थानक गाठवे. त्यानंतर तिघांना तिथून अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी संजय बांबळे, पी आय दीपक वळवी व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय चौरे व त्यांच्या पथकाने केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.