- नाशिक महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी जल्लोष केला होता
- दुसऱ्या दिवशी दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला
- भाजप कार्यकर्त्यांनी दिनकर पाटील यांच्या प्रवेशाला विरोध केला होता.
नाशिक महापालिका निवडणुकीत काही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आधी ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झाली. ही घोषणा झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. हा जल्लोष करणाऱ्यांमध्ये मनसेचे नेते दिनकर पाटील यांचा ही समावेश होता. ते या युतीच्या घोषणेनंतर पेढे वाटताना, फटाके फोडणाताना, जल्लोष करताना दिसले. पण एका रात्रीत चक्र फिरली. हेच पाटील दुसऱ्या दिवशी थेट भाजपच्या मंचावर अवतरले. मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता या प्रवेशाला एक दिवस होत नाही तोच हेच पाटील आता ढसाढसा रडताना दिसले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
दिनकर पाटील यांच्या प्रवेशाचे पडसाद भाजपमध्ये उमटले. त्यांच्या प्रवेशाला मुळ भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. पण आता दोन दिवसानंतर दिनकर पाटील हे प्रचाराला लागले आहेत. त्यांना नाशिकमधून भाजपची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या प्रभागात मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभागात मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश का केला याचे स्पष्टीकरण देत होते.
त्याचवेळी त्यांना आपला भावना अनावर झाल्या. त्यांना बोलता बोलता रडू कोसळले. आपण भाजपमध्ये जावं असं जनतेचंच मत होतं. अनेक जण आपल्याला त्याबाबत सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी ही आपल्याला पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं असं ही ते यावेळी म्हणाले. मतदारांशी हा संवाद साधताना ते भावूक झाले. त्याच वेळी त्यांना रडू कोसळले. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील दोघेही सातपूर परिसरातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी त्यांची तयारी ही सुरू केली आहे. मुलगा अमोलसाठी भाजपमध्ये यावे लागले असे ही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. भाजप सोडून कुठे ही जाणार नाही अशी भूमिका मुलाने घेतली होती. त्यामुळे आपल्याला ही त्याचा निर्णय मान्य करावा लागला असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पण हा कार्यकर्ता मेळावा त्यांच्या आश्रूंमुळेच गाजला. कारण हे तेच दिनकर पाटील आहेत जे ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करत होते. तेच पाटील एक दिवसानंतर भाजपमध्ये गेले आणि पुढच्याच दिवशी मतदारांसमोर ढसाढसा रडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world