
अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli Drugs Racket : डोंबिवली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीमध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेट्सचा पर्दाफाश केला होता. त्यांनी या सोसायटीमधून 2 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तसंच तीन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात आत्ता ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या मोहम्मद रहिम सलीम शेख याला हैद्राबाद विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तो बेहरीनला पळून जाण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोहम्मद रहिम शेख मुंब्रामध्ये कार डिलर्सचा व्यवसाय करत होता. कार डिलिंगच्या नावाखाली तो ड्रग्जचा धंदा करत होता. रहिम या कालावधीमध्ये सतत परदेशवारी करत होता. तो नक्की परदेशात कशासाठी जात होता, याचा पोलीस तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या लोढा पलावा येथील डाऊन टाऊन या हाय प्रोफाईल सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकून मानपाडा पोलिसांनी 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 2 कोटी रुपये होती. या प्रकरणात अशिल सुर्वे, मोहम्मद इशा कुरेशी आणि मेहर देवजानी या तिघांना अटक केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर कल्याणचे डिपीसी अतुल झेंडे यांनी या प्रकरणातील मुख्य म्होरक्याला शोधण्यासाठी तपास पथके नेमली. अखेर पोलिसांना यश आले.
(नक्की वाचा: Dombivli News : ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकर होणार बेघर, 'ती' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश )
मोहम्मद रहिम सलीम शेख या ड्रग्ज डिलीरला हैद्राबाद विमान तळावरुन अटक केली आहे. मोहम्मद रहिम बेहरीन जाण्याच्या तयारीत होता. त्या आधीच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळ्या आहेत. डिपीसी अतुल झेंडे यांनी सांगितले की, मोहम्मद रहिम हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या आहे. तो डिलींगचा व्यवसाय करतो.
मोहम्मद सतत परदेशात जात असे. त्याच्या परदेशवारीचं खरं कारण काय? आणखी किती जण त्याच्या रॅकेटमध्ये आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. हे अंमली पदार्थ घेणारे ग्राहक कोण आहेत? ते कशाप्रकारे हा व्यापार करत होते, हे देखील तपासामध्ये समोर येणार आहे. मोहम्मद रहीम हा त्याचा भाऊ आणि आईसोबत मुंब्रामध्ये राहतो. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये असल्याची माहिती उघड झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world