Dombivli News: डोंबिवलीतील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये चेंबरच्या साफसफाईच्या क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका कुटुंबाने दुसऱ्या शेजाऱ्याच्या अंगावर आपला पाळीव कुत्रा सोडला. या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन या उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार घडला आहे. येथील योगी कुटुंब आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या चेंबरची दोन कामगारांच्या मदतीने साफसफाई करत होते. ही साफसफाई सुरू असतानाच शेजारी राहणारे तिवारी कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणी आले. चेंबरची साफसफाई का करताय? असा प्रश्न विचारत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : Kalyan News: मिस्त्री कामाला जातो असं सांगायचा, पण निघाला अट्टल चोर; कल्याण पोलिसांचा नाशिकमध्ये थरारक सापळा )
साफसफाईवरून झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, तिवारी कुटुंबातील अनुराधा तिवारी, संतोष तिवारी आणि कृतिका तिवारी यांनी योगी कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आपल्या घरातील पाळीव कुत्राही त्यांनी योगी कुटुंबाच्या अंगावर सोडला. समोरून कुत्रा अंगावर येत असल्याचे पाहून तिथे काम करणारे दोन्ही मजूर घाबरून पळून गेले.
मात्र या दरम्यान पाळीव कुत्र्याने मनोज योगी आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला. कुत्र्याने दोघांचाही जोरात चावा घेतल्याने ते जखमी झाले. या हल्ल्यानंतर मनोज योगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर 3 दिवस उपचार सुरू होते. ही संपूर्ण घटना सोसायटी परिसरात चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat : एपस्टीनचा बाप' निघाला अशोक खरात; 56 आक्षेपार्ह क्लिप्स? 7 बड्या नेत्यांचे फोटो, अजून किती बाकी? )
या प्रकरणी योगी कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संतोष तिवारी, अनुराधा तिवारी आणि कृतिका तिवारी या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये अशा प्रकारे हिंसक वळण लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.