Kalyan News: कल्याणमधील एका तरुणाने दिवसा मिस्त्रीचे काम आणि रात्री दुचाकी चोरीचा अजब धंदा सुरू केला होता. घराबाहेर पडताना कामाला जातो असे सांगणाऱ्या पतीचे खरे कारनामे पोलिसांनी उघड केले, तेव्हा त्याची पत्नीही पार चक्रावून गेली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी ललित देवरे या 33 वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
का बनला चोर?
ललित देवरे हा मूळचा नाशिकजवळील सिन्नर परिसरातील रहिवासी आहे. तो व्यवसायाने मिस्त्री असून दिवसा कामावर जात असे. मात्र, त्याला नशेचे व्यसन जडले होते. या व्यसनासाठी मिस्त्रीच्या कामातून मिळणारे पैसे कमी पडू लागल्याने त्याने दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातून त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. त्याने चोरलेली एक बाईक चक्क जळगावमध्ये विकली होती.
पोलिसांचा रचला सापळा
कल्याण परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली होती. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी आणि पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोराचा माग काढला. संशयित चोरटा सिन्नरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन ललित देवरेला ताब्यात घेतले.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
पत्नीला धक्का
पोलिसांनी ललितच्या घरी धाड टाकली आणि त्याला अटक केली, तेव्हा त्याची पत्नी तिथेच होती. आपला पती दिवसा मिस्त्रीचे काम करतो असे तिला वाटत होते. मात्र, तो कल्याणमध्ये जाऊन दुचाकींची चोरी करतो आणि त्या विकतो हे सत्य जेव्हा पोलिसांनी सांगितले, तेव्हा तिला धक्काच बसला. पोलिसांनी ललितकडून आतापर्यंत 4 दुचाकी जप्त केल्या असून त्याने आणखी कुठे चोरी केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
कल्याण पोलिसांनी सध्या ललितला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याने जळगाव आणि इतर शहरांमध्ये चोरीच्या गाड्या विकल्याचा संशय आहे. या गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा नशेच्या आहारी गेलेली तरुण पिढी गुन्हेगारीकडे कशी वळतेय, हे भयाण वास्तव समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world