Ratnagiri News : जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास LED च्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन-सी' अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे. जयगडपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी भागात विभागाने सर्च मोड ऑन केला असून गेल्या काही दिवसांत सलग कारवाया करत अवैध LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या कारवाईमुळे मत्स्य संपत्तीची लूट करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
'मिडनाईट हंट'ची थरारक कारवाई...
जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. समुद्रातील उग्र लाटा आणि अंधाराचा फायदा घेत LED च्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या ३ नौकांना विभागाने रंगेहाथ पकडलं आहे. 'मिडनाईट हंट'च्या या थरारक कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ३ एप्रिल रोजी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना “भराडी प्रसन्न” ही नौका LED साधनांसह रंगेहाथ जप्त करण्यात आली.
त्यानंतर ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुहागर-दाभोळ परिसरात पुन्हा एकदा 'डबल स्ट्राईक' करण्यात आला. यावेळी 'सफा मरवा-१' ही नौका अवैध मासेमारी करताना सापडली. ही नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अध्यादेश २०२१ अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे आता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी सादर केली जाणार आहेत. यापुढील काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.