Bhaucha Dhakka to Vijaydurg Ro-Ro Service : महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रोल-ऑन रोल-ऑफ (Ro-Ro) प्रवासी फेरी सेवा तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. १ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या सेवेमध्ये M2M Princess या जहाजाद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास करता येत होता. सध्या फेरी सेवेच्या आतापर्यंत एकूण ६ फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.
जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ही सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. जहाजाच्या एकूण ४ इंजिनांपैकी केवळ १ इंजिन कार्यरत असून उर्वरित ३ इंजिनांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. या अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे सेवा स्थगित करावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी किती वेळाची प्रतीक्षा...
इंजिन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सुटे भाग परदेशातून मागवण्यात आले आहेत. मात्र मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीमुळे सुटे भाग पुरवठ्यात काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे १५ दिवसांत सुटे भाग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर इंजिन दुरुस्तीसाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून जहाजाची तपासणी करण्यात येईल. यानंतरच M2M Princess पुन्हा प्रवासी सेवेसाठी योग्य असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल.
नक्की वाचा - Mumbai-Vijaydurg: 7 तासात मुंबई ते कोकण थेट समुद्रमार्गातून; वेळापत्रक, तिकीट दर - संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचे स्पष्ट केलं आहे. नियमांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करूनच जहाज पुन्हा सेवेत दाखल केले जाईल, असे मंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटल आहे. प्रवाशांना सेवा पुन्हा सुरू होईपर्यंत इतर उपलब्ध पर्यायांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world