जाहिरात

Gauri Garje Suicide Case: 'ती' व्हॉइस क्लिप अन् डॉ गौरी गर्जेचा शेवट; पती अनंतनं रचलेलं भयानक षडयंत्र उघड

Gauri Garje Suicide Case: वरळीतील डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आलंय. गौरीविरोधात पतीने व्हॉइस क्लिपचं हत्यार वापरलं होतं.

Gauri Garje Suicide Case: 'ती' व्हॉइस क्लिप अन् डॉ गौरी गर्जेचा शेवट; पती अनंतनं रचलेलं भयानक षडयंत्र उघड
"Gauri Garje Suicide Case: डॉ. गौरी गर्जेच्या ब्लॅकमेलिंगचा मास्टर प्लॅन"

- पारस दामा, प्रतिनिधी
Gauri Garje Suicide Case: वरळीतील डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी भोईवाडा न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले आहे. या कागदपत्रातून गौरीच्या छळाचा आणि पती अनंत गर्जे याच्या क्रूर वागणुकीचा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. मुख्य आरोपी पती अनंत गर्जे (वय 32 वर्षे) याने केवळ लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध लपवले नाहीत तर गौरीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी मानसिक त्रास दिल्याचंही तपासात निष्पन्न झाले आहे.

विवाहबाह्य संबंध आणि गर्भधारणेचा खुलासा

गौरी आणि अनंत यांचे लग्न 7 फेब्रुवारी 2025 रोजी झाले होते. पण अनंतचे एका महिलेसोबत लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिलेच्या गर्भपाताचे कागदपत्र गौरीच्या हाती लागले होते, ज्यामध्ये अनंतचा उल्लेख त्या महिलेचा पती म्हणून करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर 2025 रोजी जेव्हा गौरीने याबाबत अनंतला जाब विचारला, तेव्हा त्याने तिला उलट धमकावले. "जर तू कोणाला काही सांगितले, तर मी चिठ्ठीत तुझे नाव लिहून आत्महत्या करेन," अशी धमकी तो सातत्याने देत होता.

नणंदेची भूमिका आणि छळ

तपासात असे समोर आले आहे की, अनंतची बहीण शीतल आंधळे हिला या सर्व प्रकरणाची माहिती होती, पण तिने ही बाब गौरीच्या कुटुंबापासून लपवून ठेवली. गौरीने जेव्हा तिची मदत मागितली, तेव्हा शीतलने तिला मदत करण्याऐवजी, "तुला अनंतसोबत राहायचे नसेल तर निघून जा, मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावून देईन," असे म्हणत गौरीचे मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप करण्यात आलाय.

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! 24 वर्षांचा तरुण आणि अल्पवयीन मुलगी; त्या प्रेमप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा खुलासा)

बदनामीची भीती आणि शेवटचा फोन

अनंत गर्जे याने केवळ शारीरिक आणि मानसिक छळच केला नाही, तर गौरीची सामाजिक प्रतिमा मलिन करण्यासाठी एक खोटी 'व्हॉइस क्लिप' तयार केली होती. ही क्लिप त्याने गौरीला पाठवली आणि ती समाजात पसरवून तिची बदनामी करण्याची भीती घातली. आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील आणि समाजात तोंड दाखवणे कठीण होईल, या भीतीपोटी गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.22 नोव्हेंबर 2025 रोजी अनंतने गौरीच्या आई-वडिलांना फोन करून ती आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पालकांनी त्याला तिला रोखण्याची विनंती केली, पण काही वेळातच त्याने गौरीचे प्रेत समोर असल्याचे कळवले. 

(नक्की वाचा: खिशातून मोबाईल काढण्यावरून वाद, मित्राच्या डोक्यात दगड घातला; जागीच मृत्यू)

न्यायालयीन प्रक्रिया

गौरीचे वडील अशोक पालवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या भोईवाडा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेंटल सर्जन म्हणून काम करणाऱ्या एका गुणी डॉक्टरचा अशा प्रकारे करुण अंत झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com