Indian Railway News: रेल्वे सुरक्षा बल आणि अबकारी विभाग दुर्गच्या टीमने एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे. निजामुद्दीन-दुर्ग हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये तैनात असलेल्या एका अटेंडंटला प्रवाशांना बेकायदेशीरपणे विदेशी दारू आणि बिअर पुरवठा करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अटेंडंट प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना विविध ब्रँड्सची व्हिस्की, रम आणि बिअर गुपचूप पुरवत असे. ही दारू तो आपल्या बॅगेत लपवून ठेवत असे. आरपीएफला यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यांनी या प्रकरणात कारवाई करीत मोठा डाव उधळून लावला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
रेल्वेमध्ये दारू पिण्यास मनाई आहे. मात्र तरीही निजामुद्दीन-दुर्ग हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोच सर्रास दारू प्यायली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या एक्सप्रेसमधील एक अटेंडंटच ही दारू पुरवित होता. आरपीएफला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, ट्रेन क्रमांक २२८६८ (निजामुद्दीन-दुर्ग हमसफर एक्सप्रेस) च्या एसी कोचमध्ये अटेंडंट मोठ्या प्रमाणात दारू घेऊन जात आहे आणि प्रवाशांना ती विकत आहे.
नक्की वाचा - Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ
ट्रेन दुर्ग स्टेशनवर पोहोचताच आरपीएफ आणि अबकारी विभागाच्या पथकाने एसी कोच (B-7) मध्ये कार्यरत असलेला अटेंडंट रीमन दास याच्या सामानाची झडती घेतली. त्याच्या बॅगेतून सुमारे १२.२३६ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. यात ३ बाटल्या व्हिस्की, १ बाटली वोडका, २ क्वार्टर व्हिस्की आणि १८ बिअर कॅन्सचा समावेश होता. या मालाची किंमत सुमारे ४,१४० रुपये इतकी आहे. आरोपी अटेंडंट रीमन दास हा दुर्गमधील दीपक नगर भागातील रहिवासी आहे. त्याने ४-५ महिन्यांपूर्वीच ट्रेनमध्ये अटेंडंट म्हणून काम सुरू केले होते. या दारूच्या साठ्याबाबत तो कोणताही परवाना किंवा कागदपत्रे सादर करू शकला नाही, त्यामुळे त्याला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world