
Eknath Khadse on Rave Party : पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. कारण या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण खडसे यांनी या कारवाईवर गंभीर आक्षेप घेत, पत्रकार परिषदेत पुणे पोलिसांवर राजकीय सूड आणि कुटुंबाला बदनाम करण्याचा थेट आरोप केला. विशेष म्हणजे, त्यांनी “रेव्ह पार्टी म्हणजे काय?” असा थेट सवाल उपस्थित करत, या प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
रेव्ह पार्टी की राजकीय कारवाई?
एकनाथ खडसे यांनी या कारवाईनंतर पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हा खरोखर कायदेशीर तपास आहे की सरकारविरोधात बोलणाऱ्यांना शांत करण्याचा डाव आहे? असा प्रश्न खडसेंनी विचारला.
“सात जण एका खोलीत बसले, संगीत नाही, डान्स नाही, गोंधळ नाही, याला रेव्ह पार्टी म्हणायचं? पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या स्पष्ट करावी. माझ्या जावयाकडे कोणताही ड्रग्ज सापडला नाही, मग त्याला मुख्य आरोपी का बनवलं? ही माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याची खेळी आहे!,'' असा आरोप खडसेंनी केला.
( नक्की वाचा : Pune Rave Party Raid: टीप मिळताच धाड! 7 जण नशेत धुंद, नाथाभाऊंचे जावई रेव्ह पार्टी प्रकरणात कसे अडकले? )
'पोलिसांनी घुसखोरी केली'
खडसेंनी पत्रकार परिषदेत सनसनाटी खुलासे केले. त्यांनी सांगितलं की, परिषदेत साध्या वेशातील सात-आठ पोलिसांनी पत्रकार म्हणून घुसखोरी केली आणि गुपचूप रेकॉर्डिंग केलं. रोहिणी खडसेंनी या पोलिसांचा व्हिडिओ काढला, जो आता व्हायरल झाला आहे. खडसे यांनी या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवाल लीक आणि खाजगी फोटो-व्हिडिओ प्रसारमाध्यमांत देण्यावरही आक्षेप घेतला. त्यांच्या मते, हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन आहे.
खडसे यांनी आता कायदेशीर लढाईची तयारी केली आहे. त्यांनी वकील असिम सरोदे यांच्याशी सल्लामसलत केली असून, पोलिसांच्या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. खडसेंनी दावा केला की, गिरीश महाजन यांच्याशी संबंधित कथित हनीट्रॅप प्रकरणात प्रश्न विचारल्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधी पक्षांनीही या प्रकरणात खडसेंना पाठिंबा दिलाय.
( नक्की वाचा : Khadse vs Mahajan: 'महिलांबाबत गिरीश महाजनांचं नावंच का पुढं येतं?' खडसेंचा जुने संदर्भ देत थेट सवाल )
खडसे कायदेशीर लढाईची तयारी करत असून, येत्या काळात न्यायालयातून सत्य समोर येईल. खरंच हे राजकीय सूड आहे की कायदेशीर कारवाई? याचं उत्तर आता न्यायालयातून मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world