मंगेश जोशी, प्रतिनिधी:
Eknath Khadse Robbery: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व खडसे कुटुंबीय हे दरोडेखोर व चोरट्यांच्या रडारवर आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील शिवराम नगर परिसरात असलेल्या मुक्ताई बंगल्यावर चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एकनाथ खडसे यांचा जळगावतील शिवराम नगर परिसरात बंगला असून या बंगल्यात एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे हे कायम येतात व या बंगल्यावर कार्यकर्त्यांची ही कायम वर्दळ असते मात्र दिवाळीमुळे एकनाथ खडसे हे आपल्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी असून बंगल्याचा केअर टेकर ही दिवाळीमुळे सुट्टीवर गेलेला आहे. त्यामुळे खडसेंचा जळगाव मधील बंगला हा बंद होता.
नक्की वाचा - Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार
हीच संधी साधून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करत एकनाथ खडसे व रक्षा खडसे तसेच एकनाथ खडसे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गोपाळ सरोदे यांच्या रूममधील साहित्य अस्ताव्यस्त करत सुमारे 7 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या वस्तू व 35 हजार रुपये रोख लंपास केले आहे. मंगळवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद
एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात असलेले सीसीटीव्ही बंद असले तरी खडसेंच्या बंगल्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे हे कैद झालेत. मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करत पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीनही चोरटे हे बंगल्याच्या बाहेर पडताना व चोरीचे साहित्य मोटरसायकलवर घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट झाले आहे. दरम्यान श्वानपथक व ठसे तज्ञ यांच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून सीसीटीव्हीत कैद झालेल्या तीन चोरट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक रवाना करण्यात आले आहे.
खडसेंच्या बंगल्यातून चोरी झालेले साहित्य
एकनाथ खडसे यांच्या बेडरूममधून 5 ग्राम वजनाच्या सोन्याच्या चार अंगठ्या व 35 हजार रुपये रोख रक्कम यासह भेट मिळालेली 1 किलो वजनाची चांदीची गदा, 1 किलो वजनाचे चांदीचे त्रिशूल, 1 किलो वजनाचे चांदीचे 6 ग्लास, 1.5 किलो वजनाची चांदीची तलवार असा ऐवज चोरी झाला आहे. एकनाथ खडसे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक यांची तळमजल्यावर पश्चिम बाजूला बेडरूम असून या बेडरूम मधून 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 3 व 4 ग्रॅम वजनाचे दोन कानातले जोड, 4 ग्रॅम वजनाचे डायमंडचे कर्णफुल, 3 व 4 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 10 ग्रॅम वजनाचा गोप व 6 भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट असा ऐवज चोरी झाला आहे. तर बंगल्याच्या वरच्या मजल्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची बेडरूम असून या बेडरूममध्ये ही चोरट्यांनी प्रवेश करत कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करत काही दागिने व दोन चांदीचे रथ चोरी केले आहे.
वेळेवर ब्लाउज शिवला नाही, टेलरला तब्बल इतका दंड; ग्राहक आयोगाचा दणका
एकनाथ खडसेंकडून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण..
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर 10 ऑक्टोंबर रोजी दरोडा पडल्याची घटना घडली होती. व या घटनेत चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून 1 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली होती. या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांची प्रॉपर्टी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच खडसेंच्या जळगाव मधील बंगल्यावरही चोरीची घटना उघडकीस आली असून यामुळे एकनाथ खडसे व खडसे कुटुंबीय हे दरोडेखोर व चोरट्यांच्या रडारवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world