आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे पक्षाचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र साडी फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
आत्महत्येपूर्वी देवकते यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर चिठ्ठी आणि फोटो पोस्ट करत ‘दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र' असा संदेश लिहिला. तसेच आपल्या मृत्यूसाठी गावचे सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेपूर्वी देवकते यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो पोस्ट केला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिलेला होता. तसेच आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी. जी. तांदळे यांना जबाबदार धरत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
घटनास्थळी घेतली धाव
व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. राजकीय पदाधिकाऱ्याकडून इतकं मोठं पाऊल उचललं जात असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधितांवर केलेल्या आरोपांबाबत त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलीस तपासानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.