अमजद खान, प्रतिनिधी
कल्याणमधील मेट्रो मॉलमध्ये दिवसाढवळ्या एक चोरीची घटना समोर आली आहे. ही चोरी कोणा सराईत चोरांनी नाही तर चांगल्या कंपनीत आणि मोठा पगार घेणाऱ्या तरुण-तरुणींनी केली आहे. दोघेही मोबाइल खरेदी करायचा म्हणून मॉलमध्ये गेले होते. मात्र मॉलमध्ये गेल्यानंतर मोबाइल विकत घेण्याऐवजी चोरीचा पर्याय निवडला आणि दोघांनाही तुरुंगवारी करण्यात आली.
दोघेही चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. परंतू एका महागड्या मॉलमध्ये मोबाइल पाहून त्यांची नियत फिरली. दोघांनी मेट्रो मॉलमधील एका शोरुमधून डिस्प्लेसाठी ठेवलेला महागडा मोबाइल चोरला. त्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. तरुण मोबाइल चोरी करुन मुंबईला निघून गेला. या घटनेनंतर पोलिसांनी शोधशोध सुरू केली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरापर्यंत पोहोचले. अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. सागर साहू आणि प्रियंका मेनन अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल देखील पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये एक तरुण आणि तरुणी फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना दोघे एका मोठ्या कंपनीच्या शोरुममध्ये शिरले. शोरुममध्ये सर्व महागडे मोबाइल डिस्प्लेवर लावले होते. तरुणीने सफाईने डिस्प्लेवरील मोबाईल बॅगेत टाकला. काही वेळ फिरले आणि नंतर निघून गेले. मोबाइल हरवल्यानंतर शोरूमच्या चालकाने सीसीटीव्ही तपासला. त्यात चोरीचा प्रकार कैद झाला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हेमंत ढोले यांनी तपास सुरू केला. मेट्रो मॉलमधील तरुण तरुणी बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद झाले होते.
नक्की वाचा - नीरजकडून कसलं वचन घेतलं? अखेर मनू भाकरच्या आईने स्पष्टच सांगितलं..
दोघेही कल्याण स्टेशनपर्यंत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यानंतर सीसीटीव्ही तपासला असता पोलिसांनी तरुणीचा पाठलाग केला. ती कुठे जात आहे. हे सगळ्या ठिकाणी दिसत आहे. अखेर जोशी बागेत लागलेल्या सीसीटीव्हीत ती एका घरात जाताना दिसली. पोलीस पथकाने त्या घरात जाऊन चौकशी केली. त्यावेळी घरात मेट्रो मॉलमधील शोरुममध्ये दिसणारी आणि मोबाईल चोरी करणारी तरुणी दिसली. पोलिसांना पाहून ती घाबरली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तरुणीच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी 62 सीसीटीव्ही तपासले. तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने तिच्यासोबत असलेल्या मित्राचे नाव सांगितले. तरुण सागर साहू हा मुंबईला राहतो. पोलिसांनी त्यालाही अटक केली. चोरी करणाऱ्या तरुणीचे नाव प्रियंका मेनन आहे. दोघेही ठाण्यातील इमिग्रेट कन्सलटंटचं काम करतात. त्यांना चांगल्या पगार आहे. मोबाईलची गरज होती. त्यांनी मोबाईल चोरी केला. मात्र त्यांच्या चोरीचे बिंग सीसीटीव्हीने फोडले.