
Punjab Ex-DGP: पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (DGP) मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी, माजी मंत्री रजिया सुल्ताना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुलगा अकील अख्तर (35) याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता एक मोठे वळण आले आहे. अकीलच्या मृत्यूआधीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंचकूला पोलिसांनी थेट मुस्तफा, त्यांच्या पत्नीसह मुलगी आणि सून अशा कुटुंबातील 5 सदस्यांविरुद्ध हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा (Criminal Conspiracy) गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये अकीलने वडिलांवर आणि कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
अकील अख्तरचा मृत्यू 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंचकूला येथे झाला. सुरुवातीला कुटुंबाने अकीलचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे (Overdose) झाल्याचे सांगितले होते. मात्र, पंचकूला मनसा देवी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा एफआयआर अकीलच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या एका व्हिडिओवर आधारित आहे, ज्यामुळे प्रकरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.
बाथरूममधील तो प्रसंग आणि अवैध संबंधाचा आरोप
मृत्यूच्या जवळपास दोन महिने आधी, म्हणजे 27 ऑगस्ट रोजी अकीलने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूची कुटुंबाने योजना आखल्याचा थेट आरोप केला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अकीलने त्याचे वडील मोहम्मद मुस्तफा आणि त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
( नक्की वाचा : Shocking! 15 वर्षांनी लहान भाच्याशी अफेअर; 2 मुलांच्या आईने पोलीस स्टेशनमध्येच उचलले भयंकर पाऊल )
अकील व्हिडिओमध्ये म्हणतो: "माझे डॅड आणि वाइफ यांच्या अफेअरबद्दल मला माहिती मिळाली आहे. याला जवळपास दीड ते दोन वर्ष झाली आहेत. लग्नाच्या एका वर्षानंतर, म्हणजे 2018 मध्ये मी या दोघांना बाथरूममध्ये पकडले होते, तेव्हा माझे वडील तिथून पळून गेले."
मानसिक त्रास आणि खोटे गुन्हे
या घटनेनंतर आपल्या वडिलांनी आपल्याला 'अवैधपणे' पोलीस कोठडीत (Detain) ठेवले होते, असा गंभीर आरोपही अकीलने केला आहे. तो पुढे सांगतो की, या सगळ्यामुळे मी खूप मानसिक तणावात आहे. कुटुंबातील सदस्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून, हत्येचाही खोटा आरोप लावल्याचा दावा अकीलने केला आहे.
"याचा बंदोबस्त करा"
व्हिडिओमध्ये अकीलने कुटुंबाच्या कटाबद्दल बोलताना म्हटले आहे: "माझी बहीण आणि माझी आई, दोघीही वडिलांच्या खोलीत बसल्या होत्या आणि माझ्याबद्दल बोलत होत्या की, याचा बंदोबस्त करा." वडिलांकडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख करताना तो म्हणाला, "माझा बाप मला टोमणे मारतो की, तुला कोणतीही मुलगी आकर्षित होणार नाही, पण मला होईल. माझा बाप स्वतःला अभिमानाने सांगतो की, मुली त्याच्याकडे आकर्षित होतात."
( नक्की वाचा : Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आयुष्याची कमाई लुटली! शेवटच्या क्षणी मुंबई पोलिसांची एंट्री; 15 लाख वाचले )
बहिणीवरही गंभीर आरोप
अकील अख्तरने व्हिडिओमध्ये त्याची बहीण आणि तिच्या पैशाच्या व्यवहारांवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्याने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांचा विरोध असतानाही त्याची बहीण एका 'वेश्येसोबत' सोबत घरातून पळून गेली होती. पुढे तो म्हणतो, "माझ्या पालकांचा तिच्या लग्नाला विरोध होता, तिच्याकडे पैसे नव्हते, ती नेमका तिचा घरखर्च कसा चालवते हे मला माहिती नाही, पण कदाचित ती देखील प्रॉस्टिट्यूशनच्या (वेश्याव्यवसायाच्या) व्यवसायात आहे."
त्याने दावा केला की, त्याची बहीण त्याच्या पैशाच्या मागे लागली आहे.
पोलिसांची पुढील कारवाई
अकील अख्तरच्या मृत्यूपूर्वीच्या या व्हिडिओमुळे हे संपूर्ण प्रकरण आता अधिक गंभीर झाले आहे. पंचकूला पोलिसांनी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी रजिया सुल्ताना आणि कुटुंबातील अन्य 3 सदस्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world