Exclusive : एन्काऊंटरच्या 4 तासांपूर्वी अक्षयची आई-वडिलांशी भेट, लेकाच्या मृत्यूनंतर पालकांची पहिली प्रतिक्रिया

Akshay Shinde Death : आज सकाळीचं आई-वडिलांची अक्षय शिंदेशी भेट झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचा आज एन्काऊंटर करण्यात आला. आज कळव्यात त्याचा पोलिसांच्या गोळीने शेवट झाला. (Akshay Shinde Encounter)

चिमुरडींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर बदलापुरात मोठं आंदोलन पुकारलं होतं. दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बदलापुरातील रेल्वेपासून सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. अगदी घराघरातील महिला रस्त्यावर, रेल्वेच्या रुळावर उतरल्या होत्या. अक्षय शिंदेच्या फाशीची मागणी केली जात होती. दरम्यान आज त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याने मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

कसा झाला एन्काऊंटर?
ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला असे म्हटले जात आहे. यात पोलीस निलेश मोरे जखमी झाले आहेत. निलेश मोरे यांच्या शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

नक्की वाचा - मोठी बातमी! बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा कळव्यात The End, रिमांडमध्ये नेताना नेमकं काय घडलं? 

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. NDTV मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, आमचा मुलगा फटाकेही फोडू शकत नाही. तो कोणत्याही मुलीवर असं कृत्य करणार नाही. पैसे देऊन त्याला मारून टाकलंय. पोलिसांनी आम्हाला संपर्क साधला नाही. कोणी कितीही बोला परंतू माझ्या पोराला फसवून मारून टाकलंय. आम्हालाही मारून टाका. आम्हालाही जगायचे नाहीये. आम्ही इथे तिथे भटकतोय. गावातल्या लोकांनी आम्हाला मारलं. आम्हाला अन्न-नाही पाणी नाही, अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेंच्या आईकडून आली आहे. 

आज सकाळीचं आई-वडिलांची अक्षय शिंदेशी झाली होती भेट...

आज सकाळी (23 सप्टेंबर) अक्षय शिंदेचे आई-वडील त्याला भेटायला गेले होते. पोलिसांनी तीन वाजता यायला सांगितलं होतं. त्यावेळी साडेतीन वाजता भेट झाली. त्यावेळी 15 मिनिटं अक्षय शिंदंसोबत त्याचं बोलणं झालं होतं. 

Advertisement

अक्षय शिंदे - चार्जशीट आली आहे. मला केव्हा सोडणार ?

अक्षयचे आई-वडील - एक महिना थांबावं लागेल.

अक्षय शिंदे - मला चिठ्ठी लिहून दिली आहे. इथल्याच मुलांनी दिली आहे. ( खिशातून चिठ्ठी काढून तो आई-वडिलांना दाखवत होता. चिठ्ठीत काय लिहिलंय हे त्याला वाचता येत नव्हतं. अर्धवट शाळा शिकलाय त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहिती नव्हतं, असं आई-वडिलांनी सांगितलं.)

अक्षयचे आई-वडील - चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल ती फेकून दे. 

अक्षय शिंदे - मी हा गुन्हा केलेला नाही. मी त्या मुलींना बोटही लावलं नाही. तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं. 

Advertisement

अक्षयचे आई-वडील - कसा आहेस ? जेवण देतात का? 

अक्षय शिंदे - पोलिसांनी पायाला मारलं बोटं फोडले.