Kalyan News : कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात गुरुवारी एका नाट्यप्रयोगादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. येथील कँटीनमध्ये लहान मुलांना विक्रीसाठी ठेवलेली कोल्ड्रिंक्स एप्रिल 2025 मध्येच एक्स्पायर झाल्याचं उघड झालं. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रेक्षक चांगलेच संतापले. संतप्त प्रेक्षकांनी जवळपास दीड तास गोंधळ घातला. प्रेक्षकांचा राग नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले होते. या सर्व गोंधळानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेनं या विषयावर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. पालिकेनं कँटीनचालकाचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) पुढील कारवाई करणार आहे.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी रात्री अत्रे रंगमंदिरात एका गुजराती नाटकाचा प्रयोग सुरू होता. मध्यंतर झाल्यावर अनेक प्रेक्षक कँटीनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी गेले. काही पालकांनी त्यांच्या मुलांसाठी कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेतल्या. एका पालकाचे लक्ष बाटलीवरील मुदतबाह्य तारखेकडे (expiry date) गेले. बाटलीवरील तारीख एप्रिल महिन्याची असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी इतर मुलांच्या हातात असलेल्या बाटल्या तपासल्या असता, त्या देखील मुदतबाह्य असल्याचे निदर्शनास आले.
हे कळताच प्रेक्षक कमालीचे भडकले. त्यांनी कँटीन कर्मचाऱ्याकडे जाब विचारला. फ्रिजमध्ये ठेवलेल्या सर्व कोल्ड्रिंक्स एक्स्पायर झालेल्या होत्या. “तुम्ही आमच्या मुलांच्या जीवाशी खेळत आहात का?” असा संतप्त सवाल विचारत प्रेक्षकांनी कँटीन कर्मचाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कर्मचाऱ्याने आपली चूक मान्य केली, मात्र त्यानंतरही प्रेक्षकांचा राग शांत झाला नाही. या घटनेमुळे रंगमंदिरात मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जवळपास दीड तासाने गोंधळ शांत झाला.
काय कारवाई होणार?
या प्रकरणी अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी सांगितले की, कँटीनचालकाचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती FDA ला दिली असून, आता FDA कँटीनचालकावर कायदेशीर कारवाई करणार आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कँटीनचालकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.