Fake Army Recruitment : बेरजोगार तरुणांना बनावट जाहिरातीच्या माध्यमातून आकर्षित करुन त्यांना बनावट सीबीआयमध्ये भरती करण्याच्या कथानकावर 'स्पेशल 26' हा हिंदी चित्रपट आधारलेला होता. चित्रपटासारखाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. सोशल मीडियावर सैन्य भरतीची जाहिरात देऊन चक्क बेरोजगार तरुणांची बनावट भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरच हा सर्व प्रकार सुरु होता. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात 93 तरुणांना 5 लाख 98 हजार रुपयांचा गंडा घातला असल्याचं उघड झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकार?
छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावानं ही भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. विशाल देवळी,विलास माने आणि सनी बागव अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. त्यांचीच स्वत: जवान असल्याचं भासवत सैन्य भरतीचं आयोजन केलं होतं. त्यासाठी सोशल मीाडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली होती. आर्मीचा ड्रेस घालून आणि वाहनावर आर्मी नाव लावून स्वतःला आर्मी अधिकारी भासवल्याने या भामट्यांवर तरुणांनी सहज विश्वास ठेवला आणि त्यांची फसवणूक झाली.
या भरतीसाठी पोलीस भरतीप्रमाणे हुबेहूब 1200 मीटर धावणे, गोळा फेक अशी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. धावण्यासाठी आणि गोळा फेकसाठी प्रत्येकी 25 मार्क देण्यात आले मैदानी चाचणीत पात्र होणाऱ्या तरुणांना 25 डिसेंबर रोजी कागदपत्रे घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
( नक्की वाचा : Pune News : लाच घेणाऱ्याला नाही तर देणाऱ्याला झाली अटक, पुण्यातील दुर्मीळ घटना )
पात्र उमेदवारांना सहा हजार रुपये नियुक्ती तसंच गणवेश शुल्क लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर 11 महिन्यांचा करार आणि बारा हजार रुपये मासिक वेतन देण्यात येईल असेही सांगितले.
पण 25 डिसेंबर रोजी उमेदवारांनी सदर भरती बाबत परवानगीच्या कागदपत्रांची मागणी केली आणि आरोपींचा भांडाफोड झाला.
या सर्व प्रकरणाचा भांडाफोड होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी पैसे ट्रान्सफर केले होते..त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणांनी थेट पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world