Eknath Shinde vs Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे शिवसेनेतील अंतर्गत समीकरणं पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसला आहे. शिरसाट यांच्या विरोधाला न जुमानता शिंदेंनी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना बळ दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री शिरसाटांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे कारण?
शिंदे आणि शिरसाट यांच्यातील वादाला उपमहापौरपदाची निवडणूक निमित्त ठरली आहे. महानगरपालिकेत भाजपचा महापौर होत असताना भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेतला होता. या पदासाठी शिवसेनेत दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. एका बाजूला जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ होते, तर दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट यांचा गट होता.
जंजाळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिरसाट समर्थकांनीही आपले अर्ज दाखल केले. यामध्ये शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनीही अर्ज भरल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी थेट आदेश काढत जंजाळ यांना उपमहापौर करण्याचे निर्देश दिले आणि शिरसाटांच्या खेळीला ब्रेक लावला.
( नक्की वाचा : Eknath Shinde: पुष्पगुच्छ नको आणि सोहळेही नको! शिंदेंनी वाढदिवसाबाबत घेतला 'हा' कठोर निर्णय, कारण काय? )
बंडातील पहिले सहकारी
21 जून 2022 रोजी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले, तेव्हा सर्वात आधी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बंडाचे निशाण फडकवणारे नेते म्हणजे संजय शिरसाट होते. या निष्ठेचे फळ म्हणून शिंदेंनी त्यांना मंत्रीपद आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची मोठी जबाबदारी दिली होती. संदिपान भुमरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारून शिरसाट पक्षात वेगाने पुढे आले होते. मात्र, आता त्याच शिरसाटांना डावलून शिंदेंनी जंजाळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने अनेकांना धक्का बसला होता.
राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही. महापालिका निवडणुकीच्या काळापासून या दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू होते. शिरसाट पालकमंत्री असतानाही संभाजीनगरमध्ये शिवसेनेची कामगिरी खालावल्याने शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
( नक्की वाचा : ZP Election 2026 : तुमचं एक मत ठरणार गावाचा विकास; जिल्हा परिषदेच्या मतदानाची A to Z माहिती वाचा एका क्लिकवर )
शिरसाटांची निराशाजनक कामगिरी
आकडेवारीवर नजर टाकली तर शिरसाटांच्या नेतृत्वाखालील कामगिरी चिंतेची बाब ठरली आहे. शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत 96 जागा लढवल्या होत्या, पण त्यांना केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत 7 पैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही 63 पैकी केवळ 16 जागांवर भाजपासोबत युती झाली आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची संपूर्ण जबाबदारी शिंदेंनी शिरसाटांच्या खांद्यावर दिली होती, परंतु अपेक्षेप्रमाणे पक्षाची वाढ झाली नाही. त्यामुळेच आता आगामी निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे निर्णय स्वतःच्या हातात घ्यायला सुरुवात केली आहे. जंजाळ यांना मिळालेली संधी हा त्याचाच एक भाग असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे शिरसाट आता बॅकफूटवर गेले असून, भविष्यात शिंदे त्यांच्याबाबत आणखी काही मोठे निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमहापौर निवडीत जंजाळांची सरशी
महानगरपालिकेच्या सत्तेत वाटा मिळवताना शिवसेनेने जंजाळ यांना पसंती दिली आहे. शिरसाट यांच्या कन्या रिंगणात असतानाही जंजाळ यांना उमेदवारी मिळणे, हा शिरसाट यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पडझड रोखण्यात शिरसाट अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. ज्या बालेकिल्ल्यात शिवसेना पूर्वी एकहाती सत्ता गाजवत होती, तिथे आता पक्षाची अवस्था बिकट झाल्याने नेतृत्वाचा शिरसाटांवरील विश्वास कमी झाल्याचे दिसून येत आहे.
शिरसाट समर्थकांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता असून, जंजाळ यांच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यातील गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये या अंतर्गत वादाचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world