Solapur News : थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार करून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Solapur News : सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार करून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हिएतनाम आणि थायलंडमधून हे बोगस अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणात सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नावे व्हॉट्सअॅपवरून पैशांची मागणी

सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नावाने बोगस सोशल मीडिया अकाऊंट तयार करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीतून हे बनावट अकाऊंट थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमधून चालवले जात असल्याचं निष्पन्न झालं आहे. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सायबर भामट्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो, नाव आणि 'Collector & District Magistrate' असे पदनाम (Designation) वापरून एक हुबेहूब प्रोफाईल बनवले आहे. या खोट्या प्रोफाईलचा वापर करून ते नागरिकांना मेसेज पाठवत आहेत आणि विविध कारणं सांगून पैशांची मागणी करत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - NEET पेपर फुटीमुळे लातूरमधील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण; विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य अन् मानसिक तणाव

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन...

या फसवणुकीच्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं की, माझ्याकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही नागरिकाकडे अशा प्रकारे वैयक्तिकरित्या पैशांची मागणी केली जात नाही. सायबर भामटे खोटे प्रोफाईल वापरून दिशाभूल करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मेसेजेसना किंवा पैशांच्या मागणीला अजिबात बळी पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच, जर कुणाला अशा प्रकारचे संशयास्पद मेसेज आले, तर त्यांनी कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता तत्काळ प्रशासनाला किंवा पोलिसांना माहिती द्यावी. या प्रकरणी सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.