प्रतिनिधी, सूरज कसबे
पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी वरमुखवाडी परिसरात एका उच्च शिक्षित तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणीसह तिच्या घरातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. प्रेमाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या कटरने तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला केला आहे.
कृष्णा बाळासाहेब काळे असं या उच्च शिक्षित तरुणाचं नाव आहे. कृष्णा मूळचा शेलपिंपळगाव खेडचा रहिवाशी असून त्यानं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. तो पुण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच दरम्यान कॉलेजला जाणाऱ्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. आणि त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम जडलं. तो तिचा पाठलाग करू लागला. तिनं त्याच्या प्रेमाच्या प्रस्तावाला नकार दिला. मात्र तरीही तो तरुणीचा पाठलाग करीत होता.
नक्की वाचा - आईला सतत होणाऱ्या मारहाणीमुळे मुलाचे टोकाचे पाऊल, वडिलांची दगडाने ठेचून हत्या
काय आहे घटना घटना क्रम ?
प्रेमाला नकार दिल्याचा राग त्याचा मनात होता. त्यामुळे एकेदिवशी तो थेट तिच्या घराजवळ जाऊन पोहोचला. खाली उभं राहून आरोपी तरुणीच्या घराकडे एकटक पाहत होता. यानंतर तरुणीने यासंदर्भात कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय घराबाहेर आले आणि त्यांनी आरोपीची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला कारमध्ये बसवले आणि दिघी पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. त्यादरम्यान आरोपीने तरुणीच्या गळ्यावर धारदार कटर लावुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी न थांबविल्याने त्याने थेट तरुणी आणि तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर हल्ला केला. यानंतर गाडी थांबवण्यात आली. यावेळी आजूबाजूचे नागरिक मदतीला धावत आले आणि त्यांनी आरोपी कृष्णा काळे याला ताब्यात घेत दिघी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी आरोपी कृष्णा बाळासाहेब काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.