मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या लेकीला सर्वां समोर गोळी झाडून ठार केलं आहे. त्यात भर म्हणून की काय बापानंतर भावानेही तिच्यावर बेछुट गोळीबार केला. तिची हत्या होण्या पुर्वी तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने आपलं लग्न जबरदस्तीने लावलं जात आहे असा आरोप केला होता. शिवाय आपलं दुसऱ्या मुला बरोबर प्रेम असल्याचं तिने म्हटलं होतं. या रागातून तिच्या वडीलांनी आणि भावाने तिची हत्या केली. गावा समोरच हा प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे त्यावेळी पोलिसही तिथे उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना मंगळवारी रात्री जवळपास 9 वाजता झाली. तनु गुर्जर या तरुणीचे विक्की मवई या तरुणा बरोबर प्रेम होते. गेल्या सहा वर्षापासून ते दोघे ही रिलेशनशिपमध्ये होते. पण हे तिच्या घरच्यांना मान्य नव्हते. तिचं लग्न घरच्यांनी ठरवलं होतं. 18 जानेवारीला तिचं लग्न होणार होतं. पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण तनु या लग्नापासून खुष नव्हती. हे लग्न जबरदस्ती केलं जात होतं. त्यामुळे तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. शिवाय आपल्या जीवाला आपल्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचं ही तिने या व्हिडीओत सांगितलं होतं. 52 सेकंदाचा हा व्हिडीओ तिने शेअर केला होता.
या व्हिडीओत ती सांगते की मी विक्कीवर प्रेम करते. मला त्याच्या बरोबरच लग्न करायचं आहे. घरातले आधी या लग्नाला तयार झाले होते. मात्र नंतर त्यांनी विरोध केला. शिवाय आपल्याला घरातले मारझोडही करत होते. आपल्याला जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली आहे. जर का आपल्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला आपले कुटुंबीय जबाबदार असतील असं तिने या व्हिडीओत म्हटलं होतं. ज्या विक्कीचा तिने उल्लेख केला होता तो आग्रा इथला रहिवाशी होता. शिवाय या दोघांचे सहा वर्षापासून प्रेम संबध होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडीओ पोलिसांच्याही निदर्शनास आला. त्यामुळे पोलिस अधिक्षक धर्मवीर सिंह यांची टीम तातडीने तनुच्या घरी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तोडगा काढण्यासाठी पंचायत ही बोलवली गेली. त्यावेळी तनुने आपण वडीलांच्या घरी राहण्यास तयार नाही असं सांगितलं. आपल्याला महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या सेंटरमध्ये ठेवावे अशी विनंती तिने केली. त्यावेळी तनुच्या वडीलांनी आपल्याला तनु बरोबर एकांतात बोलायचं आहे असं सांगितलं.
त्यानंतर जे काही झालं त्याने सर्वच जण हादरून गेले. एकांतात बोलण्याच्या बहाण्याने तनुचे वडील महेश गुर्जर यांनी त्यांच्या जवळ असलेला देशी कट्टा तिच्यावर रोखला. कोणाला काही समजण्याच्या आत त्यांनी तनुनच्या छातीत गोळी झाडली. त्याच वेळी तिथे असलेला तिचा भाऊ राहुल याने ही त्याच्या जवळची बंदूक बाहेर काढली. त्यानेही तिच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी डोक्यात, गळ्यात, डोळ्यात आणि एक नाकात लागली. त्यामुळे तनुचा जागेवरच मृत्यू झाला.
ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: परळीत तणाव! रास्ता रोको, आत्मदहनाचा प्रयत्न, कोर्टाबाहेर जोरदार राडा
त्यानंतर महेश आणि राहुल या दोघांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवरही बंदूक रोखली. ते उपस्थित असलेल्या लोकांना धमकी देवू लागले. मात्र पोलिसांनी मोठ्या सावधतेने महेशला नियंत्रणात घेतले. त्याच्याकडची बंदूक काढून घेतली. त्याला अटक करण्यात आली. मात्र तिचा भाऊ तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. तनुचं 18 जानेवारीला लग्न होणार होतं. पण त्याच्या चार दिवस आधीच तिची वडील आणि भावाने हत्या केली. बापाला पकडण्यात आलं आहे. तर भाऊ राहुलचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडील बंदूक हस्तगत करण्यात आली आहे.