अजिंक्य पाटील, प्रतिनिधी
Pune News : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांना प्रशासकीय कारवाईचा मोठा फटका बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील दुकानावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यात मार्केट यार्ड परिसरात 'बी जी गोयल अँड कंपनी' नावाचं मसाल्याचं मोठं दुकान आहे. या दुकानावर एफडीएच्या पथकाने नुकतीच धाड टाकून तपासणी केली. या तपासणी दरम्यान दुकानातून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
८ लाख रुपयांचा माल जप्त, परवान्या अभावी दुकान सील...
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तब्बल ८ लाख रुपये किमतीचा सुमारे ४ हजार किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. मालाच्या लेबलमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या आहे. यामध्ये भेसळ असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. दुकानातील मालाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप एफडीएने केला आहे. संस्थेकडील आवश्यक परवान्यामध्ये कोणतीही कायदेशीर दुरुस्ती न केल्यामुळे आणि अन्न सुरक्षा नियमांच्या तरतुदींचे सर्रास उल्लंघन केल्यामुळे, एफडीएने पुढील आदेश येईपर्यंत हे दुकान पूर्णपणे बंद करण्याची नोटीस बजावली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोयल कुटुंबियांवर झालेली ही अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सध्या पुण्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world