Karnataka News : कर्नाटकात म्हैसूरच्या विश्वेश्वरैया भागात एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणं मृतावस्थेत आढळले. यामध्ये चेतन (45), त्यांची पत्नी रुपाली (43), त्यांचा 15 वर्षांचा मुलगा आणि चेतन यांची आई प्रियवंदा (62) यांचा मृत्यू झाला. चेतन यांनी आधी तिघांना विष दिलं असावं आणि त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
म्हैसूर शहरातील पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी घटनास्थळाचा दौरा केला. मात्र अद्याप हत्येमागील कारण कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन यांची आई एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या. तर इतर सर्वजणं अपार्टमेंटच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले.
नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
मृत चेतन यांनी अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या भावाला फोन करून आपण काय करणारे हे सांगितलं होतं. आपण कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी भावाला सांगितलं होतं. यानंतर अमेरिकेतील भावाने रुपालीच्या आई-वडिलांना फोन करून चेतनच्या अपार्टमेंटमध्ये जाण्यास सांगितलं होतं. मात्र ते फ्लॅटवर पोहोचण्यापूर्वीच सर्व संपलं होतं. त्यांनी सकाळी 6 वाजता पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हे मध्य पूर्वमध्ये कामगार पाठविण्याचं काम करीत होते. मात्र त्यांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चेतन यांनी एक सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांच्या मृत्यूसाठी कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.