अमजद खान, कल्याण
भंगार चोरी केल्याच्या संशयावरुन तरुणाला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खाजगी कंपनीच्या चार सुरक्षारक्षकांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. स्टेशन परिसरात झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राजू सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे सुरु आहेत. कल्याण स्टेशन समोरील जुनं एसटी स्टॅन्ड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत केलं जात आहे. हे काम एका बड्या खाजगी कंपनीला देण्यात आलं आहे. या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचं सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आलं होतं. सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळेस त्या चोरट्याच्या मागावर होते. त्यांनी पाळत ठेवली होती. सुरक्षारक्षकांनी चोरी करणाऱ्या या तरुणाला पकडलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- धक्कादायक! 8 वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचार)
दोन दिवसांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. मृत तरुण कोण आहे, त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याचा तपास कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी करत होते. तपासादरम्यान महात्मा फुले पोलिसांनी एसटी स्टॅन्ड परिसरातील विकासकामावर देखरेख ठेवण्याकरता नेमलेल्या एका खाजगी कंपनीच्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर सत्य उघड झाले.
(नक्की वाचा - शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करताय? तर सावधान! ही बातमी आधी वाचा)
मृत तरुणाने भंगार चोरले होते. यातून सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुरक्षारक्षक इम्रान शेख, परमेश्वर धाहिजे, लहू धाडी आणि कृष्णा साबळे या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.