मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Jamner Crime News Today : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने दुसऱ्या मित्राच्या मदतीने त्याच्या मित्राची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. निलेश राजेंद्र कासार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रामदेववाडी जंगलातील तलावात एका पोत्यात निलेशचा मृतदेह आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर मध्ये राहणारा 27 वर्षीय तरुण हा फायनान्स कंपनीत नोकरी करायचा. 15 डिसेंबर रोजी तो घरी परत न आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.या तरुणाचा शोध घेत असताना शिरसोली गावाजवळ असलेल्या रामदेववाडी जवळ या तरुणाची दुचाकी आढळून आली.
पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतलं
त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या मोबाईल नंबरचे डिटेल्स काढले आणि तांत्रिक मदतीद्वारे माहिती काढली. या तरुणाचा मित्र दिनेश चौधरी व त्याचा मित्र भूषण पाटील या दोघांचे मोबाईल बंद असल्याचे पोलिसांना लक्षात आले. ते दोघेही गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन दिनेश चौधरी आणि भूषण पाटील या 2 संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या दोघांनीच निलेश कासार या तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं.
नक्की वाचा >>छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा 'बालेकिल्ला' ढासळणार? कशी आहेत युती-आघाड्यांची राजकीय गणितं? वाचा एका क्लिकवर
किरकोळ वादातून निलेशची हत्या
निलेश कासार व दिनेश चौधरी हे एकाच फायनान्स कंपनीमध्ये कामाला होते.काही दिवसापूर्वी दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते.या वादातून दिनेश चौधरीने त्याचा दुसरा मित्र भूषण पाटीलच्या मदतीने निलेशची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरला आणि रामदेव वाडी जंगलातील तलावात फेकला. पोलिसांच्या शोधमोहिमेत निलेशचा मृतदेह सापडला.एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संशयित दिनेश चौधरी व भूषण पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.