मोसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Political News : राज्यातील 29 महानगरपालिकांचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीली सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापल्या विभागात राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेचा इतिहास पाहिल्यास गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत सत्तापालट करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहे.विशेष म्हणजे दोन्ही शिवसेना आणि भाजपसाठी एमआयएमचे देखील आव्हान असणार आहे.
2015 मधील पक्षीय बलाबल
- शिवसेना 29
- भाजप 22
- एमआयएम 25
- काँग्रेस 10
- बहुजन समाज पार्टी 5
- एनसिपी 4
- अन्य 20
पहिल्यांदा प्रभागनुसार निवडणूक
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत यावेळी पहिल्यांदा प्रभागनुसार निवडणूक होणार आहे. संभाजीनगरमध्ये 115 वॉर्ड असून, एकूण 29 प्रभाग असणार आहेत. ज्यात 28 प्रभागात 4 नगरसेवक , तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये 3 नगरसेवक आहेत.
नक्की वाचा >> बीएमसी निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन'! योगी आदित्यनाथ, पवन कल्याण यांच्यासह मोठी फौज सज्ज?
पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली?
काँग्रेसच्या 10 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक इतर पक्षात गेले आहेत. उर्वरित 4 नगरसेवक काँग्रेसमध्येच आहेत. 6 नगरसेवकांमध्ये काही एमआयएममध्ये तर काहींनी शिवसेना-भाजपात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : एकूण 4 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले.
शिवसेना UBT : एकूण 29 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडे बाकी आहेत. 18 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राजकीय युती-आघाडी
भाजप : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली असली तरीही भाजपच्या सहकार्यानेच शिवसेना आपली सत्ता कायम ठेवू शकली, हा इतिहास आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने देखील आपणच मोठा भाऊ असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात जागावाटपवरून देखील रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे महायुती फुटली तर भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या
शिवसेना : भाजप स्वतःला मोठा भाऊ सांगत असतानाच शिवसेना देखील आपलाच पक्ष महानगरपालिकेत मोठा असल्याचा दावा करत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमचेच आमदार असून, लोकसभेत मतदारांनी खासदार देखील आमचाच निवडून दिला असल्याने आम्हाला जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजे,अशी शिवसेना नेत्यांची भूमिका आहे. युती न झाल्यास भाजपप्रमाणे शिवसेनेकडूनही स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : राज्यात महायुतीचे सरकार असलं तरीही,छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत तीनही पक्षाची महायुती होण्याची शक्यता कमी आहे. या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद या दोन्ही पक्षांपेक्षा कमी आहे. पण अजित पवार गटाने तब्बल 35 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ सोडून युती करण्याची शक्यता आहे.
शिवसेना (ठाकरे गट): महाविकास आघाडीचा विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ठाकरे गटाची आत्तापर्यंत एकही बैठक पार पडलेली नाही. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
काँग्रेस :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मागिल निवडणुकीत काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेस नव्या पक्षासोबत जाऊ शकते. विशेष म्हणजे 29 प्रभागापैकी 23 प्रभागात वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याबाबतचे काँग्रेसचे गणित ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे नवीन समीकरण संभाजीनगरला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट): ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने,शरद पवारांची राष्ट्रवादी काही ठिकाणी काँग्रेससोबत एकत्र येण्याची शक्यता आहे. आधीच महानगरपालिकेत राष्ट्रवादीची राजकीय ताकद कमी होती आणि त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने याचा मोठा फटका शरद पवार गटाला बसणार आहे.
एमआयएम : मागिल निवडणुकीत एमआयएम पक्षाने तब्बल 25 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी देखील एमआयएम हा आकडा कायम ठेवतो का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात एमआयएमची राजकीय ताकद जास्त आहे. याचा फायदा यावेळी देखील त्यांना होणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमधील एका मोठ्या पक्षाने देखील एमआयएमला युतीबाबत प्रस्ताव दिला आहे. पण एमआयएमने हा प्रस्ताव फेटाळून लावत, स्वबळाचा नारा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world