घरातील लेकीने ड्रायव्हरसोबत थाटला संसार; संतापलेल्या भावाचं धक्कादायक पाऊल 

ही धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान; प्रतिनिधी

प्रेम विवाह केला म्हणून मुलीच्या भावाने बहिणीसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या खुदिराम चौधरी यांनी अनुष्का वर्मा नावाच्या मुलीसोबत प्रेम विवाह केला होता. सप्टेंबर 2023 मध्ये दोघांनी घरापासून लांब जात लग्नही केलं. मात्र कुणालाच याबाबत सांगितलं नाही. 

25 एप्रिल रोजी अर्चना घरातून अचानक बेपत्ता झाली. अर्चनाच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. अर्चना एका मुलासोबत झाशीला गेली आहे, तेथून तिने कल्याणसाठी गोरखपूर एक्स्प्रेस पकडली असल्याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत नाशिक आणि मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकांना माहिती दिली. ट्रेन नाशिकमध्ये येताच काही तरुण ट्रेनमध्ये घुसले. ते खुदिराम आणि अनुष्काचा शोध घेत होते . ट्रेनमध्ये अनुष्काचा फोटो काढत असताना खुदिराम याने एका तरुणाला पाहिलं या कारणावरून खुदिराम आणि फोटो काढणाऱ्या तरुणामध्ये वाद झाला.

Advertisement

ही ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचताच सात ते आठ तरुणांनी खुदिराम आणि अनुष्का यांना घेरलं. अनुष्काला खेचत खुदिरामला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच सात तरुणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केली असता खुदिराम हा ड्रायव्हर आहे  आणि अनुष्का ही संपन्न घरातील असल्याची माहिती मिळाली. अनुष्काच्या घरातल्यांचा या लग्नाला विरोध होता मात्र अनुष्काने खुदिराम याच्याशी लग्न केलं. मात्र एका ड्रायव्हरसोबत लग्न केलं या रागातून या मुलीच्या भावाने मारहाण करणाऱ्या तरुणांना पाठवलं. खुदिरामला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घरी पाठवं असं सांगितले असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या सात तरुणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. राधेश्याम चौधरी, इम्तियाज यासिन, आशिष कुमार प्रसाद, उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद, अनुप चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलिसांकडून अनुष्काच्या भावाचा शोध सुरू आहे.

Advertisement