Navi Mumbai : अल्पवयीन मुली टार्गेटवर? नवी मुंबईतून गायब होतायेत मुली, काल 4 तर आणखी दोघी बेपत्ता

नवी मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai News : शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. २८ नोव्हेंबर, शुक्रवारी तुर्भे आणि NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार मुली बेपत्ता झाल्या होत्या. अद्याप त्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा दोन मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुर्भे पोलीस ठाण्यातील घटना

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची 14 वर्षांची मुलगी 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 13:15 ते 13:50 दरम्यान घराबाहेर गेल्यानंतर परत आलीच नाही. तिचा शोध घेतल्यानंतरही ठाव-ठिकाणा न लागल्याने त्यांनी तातडीने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली, तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारावर शोधमोहीम सुरू केली असून अज्ञात इसमाने फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

NRI सागरी पोलीस ठाण्यात आणखी एक मुलगी बेपत्ता

दुसऱ्या घटनेत, 16 वर्षांची मुलगी सेक्टर-48 सीवुड परिसरातून बेपत्ता झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी ती घरी एकटी असताना रहस्यमयरीत्या गायब झाली. तिच्या अंगावर चॉकलेटी टी-शर्ट आणि काळा प्लाझो असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तिचा मोबाईल नंबर स्विच ऑफ आहे. 

नक्की वाचा - Crime News : 50 लाखांची रक्कम आणि पुतळ्याचा 'मृत्यू'; कपडा व्यापाऱ्यांच्या कृत्याने सारेच हादरले

पोलिसांचा संयुक्त तपास सुरू

तुर्भे आणि NRI सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी — आबासाहेब पाटील, पोउपनि तुकाराम नागरे, वपोनि देवेंद्र पोळ, पोउपनि मंगेश कन्नेवाड आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम गतीने सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. मोबाइल लोकेशन्स पाहिले जात आहेत. संभाव्य संशयितांची चौकशी सुरू आहे. पूर्वीच्या FIR ची छाननी केली जात आहे. 

कुटुंबीयांची चिंता वाढली

आधीच्या चार मुलींचा शोध अद्याप लागू शकलेला नसताना या दोन नवीन घटनांमुळे नवी मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांकडून पोलिसांना सतत माहिती पुरविण्यात येत असून, त्यांचे मानसिक हाल वाढत आहेत.

Advertisement

नागरिकांना आवाहन

नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बेपत्ता मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तुर्भे किंवा NRI पोलीस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. मुलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी अल्पवयीन मुली हरवली तर त्या विषयात तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखलं करावा असे आदेश आहेत.

Topics mentioned in this article