Shocking News: माणुसकीला काळिमा फासणारी आणि क्रूरतेचा कळस गाठणारी एक संतापजनक घटना उघड झाली आहे. केवळ 2,000 रुपये घरभाडे थकल्यामुळे एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नात्यांमधील विश्वास आणि माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब मूळचे गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आहे. उपजीविकेच्या शोधात हे कुटुंब 6 महिन्यांपूर्वी मोरबी येथे स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी महिन्याला 2,000 रुपये भाड्याने एक घर घेतले होते.
मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गेल्या 4 महिन्यांचे भाडे थकले होते. या थकलेल्या भाड्याच्या वसुलीसाठी पतीने घरमालकासोबत एक अत्यंत घृणास्पद सौदा केला. त्याने स्वतःच्या पत्नीवर आणि अल्पवयीन मुलीवर घरमालकाला अत्याचार करण्याची मुभा दिली.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )
पीडितेच्या आईमुळे फुटली वाचा
घरमालक भाड्याच्या नावाखाली सातत्याने पत्नी आणि मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हा सर्व प्रकार जेव्हा पीडित महिलेच्या आईला समजला, तेव्हा त्यांनी तातडीने मोरबी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यासारख्या अत्यंत कठोर कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपींना बेड्या
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी नराधम पती आणि घरमालक या दोघांनाही अटक केली आहे. मोरबीचे पोलीस उपअधीक्षक जे.एम. लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी आणि घरमालकाने संगनमताने हे पाशवी कृत्य घडवून आणले. या गुन्ह्यात आणखी एका तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, सध्या पोलीस त्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : "डार्लिंग, तुझ्यासाठी पेपर लीक केलेत, कधी भेटतेयस?"; प्राध्यापकाची विद्यार्थिनीला थेट ऑफर! Audio Clip Viral )
अन्न आणि निवाऱ्यासाठी शहरात आलेल्या कुटुंबावर अशा प्रकारे ओढवलेल्या संकटामुळे आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्याने केलेल्या विश्वासघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू केला असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.