जाहिरात

NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड

NEET Paper Leak : लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या परीक्षेबाबत एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती आता समोर आली आहे.

NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील  सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड
NEET Paper Leak : इतका मोठा खटाटोप करूनही ऋषीला या परीक्षेत यश मिळवता आलेले नाही. 
मुंबई:

NEET Paper Leak : लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या परीक्षेबाबत एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती आता समोर आली आहे. मेडिकल प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी देशभरातून मागणी होत असताना, एका विद्यार्थ्याच्या कृत्याने या विषयातील आणखी एक पैलू समोर आला आहे. ज्या परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, तिथे आयते पेपर हातात मिळूनही नशिबाने साथ दिली नसल्याचे चित्र दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या हाती आता एक महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणातील आरोपी दिनेश बिवाल याच्या मुलाने, म्हणजेच ऋषी बिवालने परीक्षेआधीच पेपर मिळवला होता असा संशय आहे. मात्र, इतका मोठा खटाटोप करूनही ऋषीला या परीक्षेत यश मिळवता आलेले नाही. 

उपलब्ध माहितीनुसार, 720 पैकी त्याला केवळ 107 मार्क मिळतील असा अंदाज आहे. पेपर हातात असूनही हा एवढा कमी स्कोर आल्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. सध्या ऋषी बिवाल फरार असून सीबीआय त्याचे शोध घेत आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )

अभ्यासात कच्चा तरीही डॉक्टर बनण्याचे स्वप्न

ऋषीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याने 10 वीची परीक्षा केवळ 44 टक्के मार्कांनी उत्तीर्ण केली होती, तर 12 वीतही त्याला जेमतेम द्वितीय श्रेणी मिळाली होती. विशेष म्हणजे, 12 वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी त्याला ग्रेस मार्क्सचा सहारा घ्यावा लागला होता. त्याची एकूण टक्केवारी 50.80 इतकी होती. फिजिक्स आणि केमिस्ट्री सारख्या महत्त्वाच्या विषयांच्या थिअरीमध्ये तो प्रचंड कच्चा होता. तरीही घरच्यांनी त्याला जबरदस्तीने मेडिकल क्षेत्राकडे ढकलले आणि त्यासाठी वाममार्गाचा अवलंब केल्याचे दिसत आहे.

पेपर खरेदी करूनही अपयश

आपला मुलगा कसाही करून डॉक्टर झाला पाहिजे, या हट्टापायी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी पेपर खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, ज्याचे अभ्यासाचे मूळच कच्चे होते, त्याला पेपर मिळूनही उत्तरं नीट लिहिता आली नाहीत. पेपर मिळवल्यानंतरही त्याचा परफॉर्मन्स अत्यंत खराब राहिला आणि त्याला 107 मार्कांवरच समाधान मानावे लागत आहे. मुलाला डॉक्टर बनवण्याचे पालकांचे स्वप्न आणि त्यासाठी केलेला गैरप्रकार आता त्यांच्याच अंगलट आला आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )

तपास यंत्रणांचा शोध सुरू

सीबीआय आता या संपूर्ण नेटवर्कमध्ये ऋषीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास करत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याला हा पेपर नक्की कोणाकडून मिळाला, याचे धागेदोरे शोधले जात आहेत. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणाऱ्या या रॅकेटमधील प्रत्येक दुवा शोधण्यासाठी आता वेगाने हालचाली सुरू आहेत. ऋषी सापडल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com