Nagpur News : मकरसंक्रांतीनिमित्ताने महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. धक्कादायक बाब म्हणजे पतंगासाठी जीवघेणा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या मांजामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्यांसोबत अनेक अपघात घडले आहेत. याच मांज्यातून अनेक दुचाकीस्वारांची मान कापली गेली आहे. याशिवाय हा नायलॉन मांजा पक्षांसाठीही धोकादायक आहे.
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या विक्रेत्यास २ लाख ५० हजार रुपयांचा दंड, तर नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडून नायलॉन मांजा वापर झाल्यास हा दंड त्यांच्या पालकांकडून वसूल केला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
दंडातून वसूल होणारी रक्कम सार्वजनिक कल्याण निधीत जमा केली जाईल आणि नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पीडितांच्या उपचारासाठी वापरण्यात येईल. दंड न भरल्यास महसूल कायद्यानुसार वसुली केली जाईल. नायलॉन मांजाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेलमार्फत व्हॉट्सॲप गट तयार करण्यात येणार आहे. दंडाबाबतची माहिती दैनिकांमधून प्रसिद्ध केली जाणार असून माहिती नव्हती, असा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही.