Navi Mumbai : पंजाबमधून थेट नवी मुंबईत हेरॉईनचा पुरवठा; लाखोंचा माल जप्त

नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्याने मोठी कामगिरी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्याने मोठी कामगिरी केली आहे. पंजाबमधून महाराष्ट्रात हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पंजाबमधील अमृतसर येथून सुमारे ७ लाख रुपये किमतीच्या हेरॉईनसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान हेरॉईन हा अमली पदार्थ थेट पंजाब येथून महाराष्ट्रात पाठवला जात असल्याचे निष्पन्न झाले. तपासात सदर गुन्ह्याचा मुख्य आरोपी अमृतसर (पंजाब) येथूनच अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी हा स्वतःच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारत असल्याचेही उघड झाले होते.

तीन वेळा पंजाब दौरा, तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा छडा

मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी एपीएमसी पोलिसांची विशेष टीम तीन वेळा पंजाबमध्ये जाऊन आली होती. मात्र आरोपी सातत्याने वेगवेगळे मोबाईल फोन वापरत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांनी आरोपीकडील चार मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करून त्याचा ठावठिकाणा निष्पन्न केला. त्यानंतर सापळा रचून अमृतसर येथून आरोपीला ७ लाख रुपये किमतीच्या हेरॉईनसह ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव साहेब सिंग उर्फ सभा जोगिंदर सिंग असून तो पंजाबचा आहे. तपासात आरोपीविरोधात यापूर्वीही अमली पदार्थासंदर्भात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

नक्की वाचा - Telangana Mass Dog Killing : धक्कादायक! भटक्या कुत्र्यांचं सामूहिक हत्याकांड, तब्बल 1100 मुक्या जीवांची कत्तल

नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत ५ गुन्हे, २८ आरोपी अटकेत

पंजाब येथून महाराष्ट्रात हेरॉईन विक्री करणाऱ्या या टोळीविरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एपीएमसी पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून पोलीस अधिक तपास करून इतर सहभागी आरोपींचा शोध घेत आहेत.

Topics mentioned in this article