Hingoli Crime : घटस्फोटाची मागणी अन् सासरवाडीत रक्ताचा पाट वाहिला, पोलिसाच्या कृत्याने हिंगोली हादरलं! 

जाहिरात
Read Time: 2 mins
हिंगोली:

समाधान कांबळे, प्रतिनिधी

हिंगोली शहरातील प्रगती नगर भागात 25 डिसेंबरच्या रात्री गोळीबार झाला. हा गोळीबार कुणा  गुंड्यांच्या टोळीमध्ये झाला नव्हता. तर एका पोलीस शिपायाने आपल्याच कुटुंबावर केला होता. स्वत:च्या  सासरवाडीत येऊन त्याने कुटुंबावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रात्रीच तो फरार झाला होता. यानंतर आरोपी पोलीस शिपायाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री कारवाडी शिवारातून ताब्यात घेतलं आहे. घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचा आणि त्याची पत्नी मयुरी हिच्या सोबत घरगुती वाद होता. यातून त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं होऊ लागली होती. त्यामुळे मयुरी दोन दिवसांपूर्वी हिंगोली येथील प्रगती नगर येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. 25 तारखेला दिवसभर पती-पत्नीमध्ये मोबाइल वरून संभाषण झाले. यामध्ये विलास यांनी घटस्फोट देण्याची मागणी केली होती यावरूनच हे संपूर्ण वादाला तोंड फुटले होते.

नक्की वाचा - Hingoli Crime : हिंगोलीत पोलिसाचा स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू; अनेकजण जखमी

त्यानंतर रागाच्या भरात विलास मुकाडे याने वसमत शहर पोलीस ठाण्यातील शस्त्र आगारातून नऊ एमएमचे पिस्टल व काडतूस घेऊन हिंगोलीच्या प्रगती नगर येथे असलेल्या सासरवाडीत आला. त्यानंतर त्याने मागचा पुढचा विचार न करता पत्नी, सासू, मेव्हणा आणि लहान मुलावर गोळ्या झाडल्या. या घटनेत आरोपीने पाच राऊंड फायर केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.

Advertisement

दरम्यान ही गोळीबारीची घटना झाल्यानंतर विलास मुकाडे यांनी सासरवाडीतील घराच्या मागच्या बाजूला पिस्टल फेकून पळ काढला. त्यानंतर हिंगोली पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली होती. त्याचबरोबर श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत कारवाडी शेत शिवारातून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​Satish Wagh Murder : शेजारच्या पवनकुमारसोबत प्रेमसंबंध, पतीचा अडथळा; योगेश टिळेकरांच्या मामीच हत्येच्या मास्टरमाईंड

दरम्यान या घटनेत विलास मुकाडे यांच्या सासू वंदना धनवे आणि मेहुना योगेश धनवे यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहेत. तर लहान मुलाच्या पायाला गोळी लागली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर या दोघांना नांदेड येथे शस्त्रक्रियेसाठी हलवण्यात आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

Topics mentioned in this article