राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबई कामोठे परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक हिट अँड रनची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत एका महिला पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. धक्का दिल्यानंतरही चालकाने गाडी न थांबवता रस्त्यावरील आणि पार्किंगमधील वाहनांना धडकवत निघून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आरोपी चालकाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना रविवारी (22 जून 2025) सायंकाळी सुमारे 6.30 च्या सुमारास घडली. कामोठे सेक्टर 6ए येथील सरोवर हॉटेलसमोर एमएच 02 बीजी 6723 क्रमांकाची सफेद स्विफ्ट कार एका महिलेवर आदळली. महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या गाडीने तिच्यावर जोरदार धडक दिली. या धडकेत त्या महिलेचा ताळतंत्र बिघडून ती थेट रस्त्यावर आदळली. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
धडक देऊनही गाडी थांबली नाही...
अपघातानंतर चालकाने थांबण्याऐवजी कार वेगात पुढे नेली आणि पुढील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन ते चार दुचाकी आणि दोन कारना धडक दिली. त्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा थरार पाहताच आसपासचे नागरिक तत्काळ मदतीला धावले. काहींनी कारचा पाठलाग करत पार्किंगच्या ठिकाणी चालकाला अडवले. यावेळी आरोपीचा संतुलन पूर्णपणे बिघडलेला होता. नागरिकांनी त्याला कारमधून खेचून बाहेर काढले आणि जोरदार चोप दिला.
नक्की वाचा - Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!
नागरिकांच्या तत्परतेने पोलिसांच्या हवाली..
घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाने आरोपी चालकाला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय चाचणीसाठी MGM रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासात चालक मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जखमी महिलेवर MGM कळंबोली रुग्णालयात उपचार
या अपघातात जखमी झालेल्या महिलेवर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती "स्थिर पण नाजूक" असल्याचे सांगितले आहे. तिच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर इजा झाली आहे.
नवी मुंबई कामोठे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की, गंभीर अपघात, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, आणि प्राणघातक कृत्य या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातही अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहतूक शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक पोलिसांकडून दर आठवड्याला 'ड्रंक अँड ड्राईव्ह' मोहीम राबवली जाते. मात्र, अशा दुर्घटनांवरून या मोहिमांचे किती परिणामकारक पालन होते, हे तपासले पाहिजे.