जाहिरात

Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!

चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून लेकीला इतकं मारलं की यातच तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!

(Sangli Crime) सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक अत्यंत वेदनादायी प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षक बापाने आपल्या 17 वर्षांच्या पोटच्या लेकीला कमी गुण मिळाले म्हणून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले धोंडीराम भोसले (Father Dhondiram Bhosale) यांनी मुलगी साधना (17 वर्षे) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. शेवटी रविवारी बाप धोंडीराम भोसले याला अटक करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपी बाप नेलकरंजी गावात एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते. पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत. तर त्यांची मुलगी बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती. तिला बारावीला चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. यानंतर शुक्रवारी रागाच्या भरात धोंडीराम यांनी मुलीला बेदम मारहाण केली. कमी गुण कसे मिळाले असं विचारत तिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात साधना इतकी जखमी झाली की यातच तिचा मृत्यू झाला. 

साधना डॉक्टर करण्याचं कुटुंबीयांचं स्वप्न...

साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. ती डॉक्टर व्हावी असं कुटुंबीयांचं स्वप्न होतं. यासाठी ती प्रवेश परीक्षेची तयारी करीत होती. परीक्षेसाठी साधनाला खासगी शिकवणी लावण्यात आली होती. तिथे नुकतीच एक चाचणी परीक्षा झाली होती. यात तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे साधनाचे वडील धोंडीराम रागावले होते. त्यांनी याबाबत मुलीला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला होता. यावेळी त्यांनी साधनाला जबर मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

तुम्ही काय कलेक्टर झालात का? 

मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरुन साधना आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला होता. धोडींराम मुलीला ओरडत होते. तुझ्यासाठी एवढा खर्च करतो, कशी डॉक्टर होणार, तुझं कसं होईल अशा शब्दात तिला सुनावत होते. यावेळी साधनाने वडिलांना उलट उत्तर दिलं. पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षक झालाच ना? लेकीने असं म्हटल्यानंतर धोंडीराम यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. त्यांनी तिच्या पोटात लाथा घातल्या. पत्नी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. काही वेळ धोडींराम थांबले. मात्र पुन्हा काही वेळाने ते साधनाला मारू लागले. त्या रात्रीमध्ये धोंडीरामांनी साधनाला खूप वेळा मारलं. दुसऱ्या दिवशी शनिवारी योग दिवस असल्याने धोंडीराम सकाळीच कार्यक्रमासाठी निघून गेले. तिला दवाखान्यात नेलं नाही ती घरात बेशुद्ध अवस्थेत पडून होती. मात्र बराच वेळ तिला जाग न आल्याने भोसले कुटुंबीयांनी तिला सांगलीतील रुग्णालयात नेलं. मुलगी बाथरूममध्ये पडल्याचं सांगून तिला उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 

साधनाच्या शवविच्छेदनातून नेमका प्रकार उघड..


साधनाचं शवविच्छेदन करीत असताना तिच्या अंगावर अनेक ठिकाणी खूणा आढळून आल्या. भोसले कुटुंबीयांनी ती बाथरूममध्ये पडल्याचं सांगून रुग्णालयात दाखल करून घेतलं होतं. मात्र शवविच्छेदनासाठी मारहाणीतून साधनाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पत्नीच्या तक्रारीनंतर धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com