Buldhana News : झोपेतच पत्नीला संपवलं; 4 वर्षांच्या मुलाचीही सुटका नाही; स्वत:च्याच कुटुंबाचा भयंकर शेवट

बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढत चालला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana Crime News :  बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढत चालला आहे. पत्नीच्या चरित्र्यावर संशय असलेल्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा आणि ४ वर्षाच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. रविवारी रात्री साधारण २ ते ३ दरम्यान मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला.  या घटनेत रूपाली राहुल मस्के वय वर्ष 30 आणि तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल मस्के (४) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी पती राहुल हरी म्हस्के वय वर्ष 35 याच्या विरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक रूपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 

झोपेतच पत्नीवर हल्ला...

राहुल मस्के त्यांची पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद मस्के, आई ताराबाई हरी मस्के आणि आजी असे सहा जण एकाच घरात वास्तव्यास होते. रविवारी रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना पत्नीच्या चरित्रावर संशय घेणाऱ्या राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून झोपेत असलेल्या रूपाली आणि रियांशच्या डोक्यावर घाव घातले. आरडा ओरड झाल्याने आरोपीची आई ताराबाई मस्के यांना जाग आली. त्यांनी बाहेर येत आरडा ओरड केल्यावर समोरच राहणारे संजय समाधान कळसकर यांच्यासह शेजारील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील रूपाली यांना प्रथम मेहकर येथे रुग्णालयात त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, थानेदार व्यंकटेश्वर अलेवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेण्यात आलं असून आरोपीची मानसिक स्थिती व संशयाची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. 

नक्की वाचा - Beed News: बुलढाणा अर्बन बँक बंद होणार? अफवा वाऱ्यासारखी पसरली; कर्मचारी अक्षरश: वैतागले

राहुलने मुलाला घरात कोंडलं!

घटनेनंतर आरोपी राहुल मस्के याने स्वतःचा मुलगा रियांशला घरात एका खोलीत कोंडून घेतलं होतं.  संशय बळावल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा आग्रह धरला. दरवाजा उघड्यानंतर आत रियांश गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. फक्त चार वर्षाचा निष्पाप रियांशचा कौटुंबिक कलहातून बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात घडलेली ही घटना या वर्षातील सर्वात सर्वांना हादरून सोडणारी आहे. संशय आणि क्षणाचा राग डोक्यात धरल्यास अखखं कुटुंब संपून जातं, हे यावरुन दिसून येत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article