आकाश सावंत, बीड
Beed News: बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात काल एक वेगळेच नाट्य पाहायला मिळाले. बीड-परळी महामार्गावर असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेबाबत "बँक बंद होणार आहे" अशी एक चुकीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या अफवेने नागरिक इतके भयभीत झाले की, दिवसभरासह मध्यरात्रीपर्यंत बँकेसमोर ठेवीदारांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.
अफवेने भीतीचे वातावरण
जिल्ह्यात यापूर्वी काही पतसंस्थांमध्ये सामान्य नागरिकांचे पैसे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तोच अनुभव पुन्हा येऊ नये, या भीतीने वडवणीतील खातेदारांनी बँकेकडे धाव घेतली.
(नक्की वाचा- What is AB Form: एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत त्याचे महत्त्व काय? Q&A)
पैसे काढण्यासाठी चढाओढ
बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. अनेक खातेदारांनी आपले गहाण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी रात्री उशीरापर्यंत बँकेचे व्यवहार सुरू ठेवण्यास भाग पाडले. परिस्थिती इतकी गंभीर होती की, बँकेला मध्यरात्रीपर्यंत आपले कामकाज सुरू ठेवावे लागले.
(नक्की वाचा- Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)
जिल्ह्यात 13 शाखा
बीड जिल्ह्यात बुलढाणा अर्बनच्या एकूण 13 शाखा आहेत. उर्वरित 12 शाखांमध्ये कामकाज सुरळीत सुरू असताना केवळ वडवणीतच ही अफवा पसरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन वर्षात या बँका बुडाल्या
बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. या सर्व बँकांमध्ये ठेवी परत मिळाल्या नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून ठेवीदार मल्टीस्टेट बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावे; अशी मागणी करत शेकडो ठेवीदार अनेकदा रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता बुलढाणा अर्बन बँकेच्या अफवेने पुन्हा एकदा ठेवीदार आक्रमक झाले आहेत.