Pune Crime News : पुण्यातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ शनिवारी मध्यरात्रीचा असल्याचं सांगितलं जात आहे. येथे मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने वेगाने वाहन चालवित अनेक वाहनांना धडक दिली. यावेळी तरुणासोबत आणखी काही तरुणीही असल्याचं दिसत आहे. हे सर्वजण दारुच्या नशेत (Pune Viral Video) असल्याचं सांगितलं जात आहे.
शनिवारी रात्री नारायण पेठेत नेमकं काय घडलं?
हा व्हिडिओ नारायण पेठेतील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोंधळ घालताना दिसत आहे. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवित होता. यादरम्यान त्याने कारने अनेक वाहनांना धडक दिल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. यानंतर स्थानिकांनी त्या तरुणाला कारमधून बाहेर काढलं. नारायण पेठेमध्ये बराच काळ स्थानिक व तरुणांमध्ये बाचाबाची सुरू होती. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी नाही. मात्र शनिवारी रात्री नारायण पेठेत मोठा राडा झाला. यावेळी तरुणासोबत काही तरुणी दिसत आहेत. यापैकी एक तरुणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला स्वत:चा भाऊ असल्याचं सांगत आहे. ती त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान तरुण मात्र स्थानिकांशी हुज्जत घालत होता. 'मी पोलिसाचा मुलगा आहे, मला दारू पिऊ द्या' असं तो म्हणत आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा - Pune News : आधी ड्रोनने पाहणी, पहाटे गावावर छापा; पुणे पोलिसांच्या 105 जणांच्या कारवाईची देशभरात मोठी चर्चा
काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या कारमध्ये चौघेजण होते. यामध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. चौघेजण मद्यधुंद अवस्थेत होते असं सांगितलं जात आहे. या तरुणांच्या कारने अपंग व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. दरम्यान हे चौघेजण नेमकं कुठले याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.