Navi Mumbai News: फर्जी कॉल सेंटरला खाकीचे 'प्रोटेक्शन'; नवी मुंबई कनेक्शनने बड्या IPS अधिकाऱ्यांची झोप उडाली

Igatpuri Call Center Scam: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील फर्जी कॉल सेंटर प्रकरणाने आता संपूर्ण पोलीस दलाला हादरवून सोडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Navi Mumbai Crime News : तपासाचे धागेदोरे आता थेट नवी मुंबईतील काही वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
नवी मुंबई:

Igatpuri Call Center Scam: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील फर्जी कॉल सेंटर प्रकरणाने आता संपूर्ण पोलीस दलाला हादरवून सोडले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात CBI ने या प्रकरणात आपली चौकशी कमालीची वेगवान केली असून तपासाचे धागेदोरे आता थेट नवी मुंबईतील काही वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास थंडावल्याचे चित्र दिसत होते, मात्र दिल्लीतील गृह मंत्रालयाने दिलेल्या विशेष निर्देशानंतर आता या चौकशीला मोठी गती मिळाली आहे. सायबर फसवणूक करणारी टोळी आणि पोलीस यंत्रणेतील काही बड्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे धक्कादायक वास्तव यातून समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सीबीआयच्या रडारवर बडे IPS अधिकारी

या प्रकरणातील तपासाची दिशा आता थेट वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांकडे वळली आहे. सीबीआयने याआधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या काही अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. 

विशेषतः नवी मुंबईत कार्यरत असलेले काही वरिष्ठ अधिकारी सध्या सीबीआयच्या रडारवर असून, गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. गुन्हेगारी सिंडिकेटला अधिकृत संरक्षण देण्यामध्ये कोणाकोणाचा हात होता, याचा शोध आता केंद्रीय यंत्रणा घेत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनादिवशीच मंत्रालयात गैरप्रकार? अल्पसंख्याक विभागातील 'तो' धक्कादायक प्रकार उघड )

नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षकांची चौकशी 

मंगळवारी बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात मोठी घडामोड पाहायला मिळाली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील यांची तब्बल 5 तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. पाटील यांना यापूर्वी 21 जानेवारी रोजी समन्स पाठवण्यात आले होते, मात्र एअरफोर्स एअर शोच्या बंदोबस्तामुळे त्यांनी वेळ मागून घेतली होती. 

अटकेत असलेला कॉल सेंटर चालक विशाल यादव याने दिलेल्या जबाबाच्या आधारे पाटील यांना अनेक कठीण प्रश्न विचारण्यात आले. विशेष म्हणजे, एका मध्यस्थाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कॉल सेंटर चालक यांच्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय यंत्रणेला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Shocking : घरात छळ, लिफ्टमध्ये गाठलं, केबिनमध्येही सोडलं नाही... प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार )

पालघरचे पीएसआय भारत पाटील यांचीही पाच तास चौकशी

केवळ वरिष्ठ अधिकारीच नव्हे, तर खालच्या स्तरावरील कर्मचारीही या चौकशीच्या कक्षेत आले आहेत. सध्या पालघर पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांचीही त्याच दिवशी 5 तास चौकशी करण्यात आली.

भारत पाटील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वसुली करण्याचे काम करत होते, असा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. विशाल यादव याने दिलेल्या माहितीनुसार, या सिंडिकेटला संवेदनशील माहिती पुरवणे आणि त्यांना कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत.

Advertisement

असे चालायचे फर्जी कॉल सेंटरचे नेटवर्क

हे सिंडिकेट 2022 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत पालघर, ठाणे, मीरा-भाईंदर, रायगड आणि मुंबई परिसरात अत्यंत सक्रिय होते. हे लोक तांत्रिक सहाय्य देणारे अधिकारी असल्याचे भासवून परदेशी नागरिकांची फसवणूक करत असत. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याची बदली व्हायची, तेव्हा हे कॉल सेंटर देखील आपले ठिकाण बदलत असे. 

पालघरमधून जेव्हा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तेव्हा या टोळीने आपले ठिकाण सापहळे येथील फार्महाऊसवरून थेट इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये हलवले होते. यावरून त्यांना मिळणारे राजकीय आणि पोलीस संरक्षण स्पष्टपणे दिसून येते.

दोन्ही अधिकाऱ्यांनी फेटाळले सर्व आरोप

चौकशीदरम्यान बालासाहेब पाटील यांनी आपले या प्रकरणाशी कोणतेही देणेघेणे नसल्याचे सांगितले. त्यांनी नाशिकचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच इगतपुरीतील व्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, वाडा येथे आपण स्वतः कारवाई करून एका कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. 

दुसरीकडे, भारत पाटील यांनीही विशाल यादवशी केवळ आपल्या भावाच्या कार व्यवसायामुळे ओळख असल्याचे सांगितले. मात्र, सीबीआय या उत्तरांनी समाधानी नसून या दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे.