सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये 40 ते 50 डेसिबल, निवासी भागात 45 ते 55 डेसिबल, व्यापारी झोनमध्ये 55 ते 65 डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रातून 70 ते 75 डेसिबलपर्यंत आवाज बंधनकारक आहे.
मात्र सर्व नियमांना बगल देत सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत हा नियम पायदळी तुडविला जात आहे. नुकत्याच झालेल्या श्री मार्कंडेय मिरवणुकीत अनेकांनी कानात बोटे, बोळे घातले होते, तरीपण 'डीजे'चा आवाज मर्यादेतच होता, असा दावा जेलरोड पोलिसांनी केला आहे.
शनिवारी 9 तारखेला श्री मार्कंडेय मिरवणुकीतही 'डीजे'चा दणदणाट ऐकायला मिळाला. या मिरवणुकीत खुद्द जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याच कानात कापसाचे बोळे दिसले. अन्य काही पोलीस अंमलदारांचेही तसेच होते. याशिवाय मिरवणुकीत सहभागी अनेकांनी कानात बोटे घातलेली होती. सोलापूर शहरात वर्षातील 365 पैकी 187 दिवस सार्वजनिक मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणारे शहर म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डला सोलापूरची नोंद आहे.
नक्की वाचा - प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड, 71 मोबाइलसह कोट्यवधींची रोकड जप्त
'डीजे'च्या कर्णकर्कश आवाजामुळे काहींना बहिरेपणा आला, हदविकाराच्या त्रासातून अनेकांची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी अभिषेक बिराजदार (वय 27) या तरुणाचा हदयविकाराने मृत्यू झाला होता.