
संजय तिवारी, प्रतिनिधी
Tiger Killed : चंद्रपूर जिल्हयात बहेलिया शिकाऱ्यांचा टोळी प्रमुख अजित राजगोंडच्या अटकेनंतर (Chandrapur News) आता संबंधित तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड होत आहे. या एकूण वाघांच्या हत्या प्रकरणातील आंतराराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रानुसार बहेलिया टोळीकडून वाघांची शिकार करण्यात येऊन त्याद्वारे अवयव विक्रीत तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. (Tiger Killing International Connection) आता पर्यंतच्या तपासात कमीत कमी तीन वाघांच्या शिकारीची माहिती मिळाली असून देशभरात वाघांच्या सुरक्षेसाठी रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवी दिल्ली स्थित वन्य जीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) कडून देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना आणि देशातील सर्व महत्त्वाच्या वाघांच्या वस्ती असलेल्या क्षेत्रांशी संबंधित अधिकाऱ्यांना ‘रेड अलर्ट' देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आलेला अजितच्या मोबाइल फोनमधून प्राप्त माहितीनुसार विदर्भातील वाघांच्या शिकार प्रकरणात शिलाँग येथून लाललीसंग नावाच्या एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात चीनसह अन्य देशांना वाघांचे अवयव पुरविण्यात आले असावेत असा दाट संशय निर्माण झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
आसाम रेजिमेंटमधून सेवानिवृत्त झालेल्या लालली संग हा अजित राजगोंड आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार माफिया यांच्या दरम्यान दुवा असण्याची शक्यता असल्याचे आता हळूहळू पुढे येत आहे. लालली संग सोबत अजित याने किमान सत्तर लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे अजित यांच्या भ्रमणध्वनीतील माहितीतून आधी स्पष्ट झाले होते. मात्र आता वाघाच्या अवयवांचा हा व्यवहार दोन कोटींच्या पुढे असल्याची माहिती आहे. अटकेच्या ठिकाणाहून जप्त केलेले केस, हाडाचा तुकडा, मोठा दात हे नमुने वाघाचेच असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा - Tiger Hunting : वाघांची निघृणपणे हत्या करणारा कुप्रसिध्द शिकारी अजित राजगोंडला 6 दिवसांची वन कोठडी
वाघांची हाडे आणि कातडी यांसारख्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात 20 ते 25 कोटी रुपये इतक्या मूल्यांची (Bahelia Shikari) ऑफर असते. त्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दहा वाघांच्या हत्येचा संबंध असण्याची शक्यता लक्षात घेता हे प्रकरण आणखी मोठे रूप घेऊ शकते, असे वन विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पुढील राष्ट्रीय स्तरावर तपासात अधिक मदत आणि अपेक्षित योग्य समन्वय राखण्यासाठी एक स्वतंत्र विशेष तपास पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA), वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB), नवी दिल्ली येथील विशेष कार्य दलाचे सदस्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र वन विभागाचे सदस्य यांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रात सुद्धा विविध तपास पथके स्थापन करण्यात आली असून विशेष गस्त घालण्यात येत आहे.
अजित राजगोंड उर्फ अजित पारधी याला 25 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते आणि 26 जानेवारीला त्याला अटक करण्यात आली होती. अजितसोबत त्याच्या कुटुंबीयांना देखील अटक कऱण्यात आली होती. या सर्व आरोपींच्या वनकोठडीत चार फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world