Jaipur School Suicide : जयपूरमधील एका नामांकित शाळेत (नीरजा मोदी स्कूल) शिकणाऱ्या 9 वर्षांच्या अमायरा (बदललेले नाव) हिने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी अमायराने रडत रडत आपल्या आईला 'मला शाळेत पाठवू नका' अशी विनंती केली होती, ज्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग आता समोर आला आहे.
अमायराचे पालक शिवानी आणि विजय मीना यांनी शाळेच्या प्रशासनावर आणि शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'एनडीटीव्ही'ला सांगितले की, अमायराला शाळेतील काही मुले सतत चिढवत (Bullying) होती आणि तिची थट्टा करत होती. याबद्दल त्यांनी गेल्या एका वर्षात वारंवार तक्रारी करूनही शाळेने या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
आईने रेकॉर्ड केलेला ऑडिओ
अमायराची आई शिवानी मीना यांनी सांगितले की, जवळपास एका वर्षापूर्वी अमायरा रडत 'मला शाळेत जायचे नाही, प्लीज मला पाठवू नका' असे म्हणत होती. मुलीची मानसिक स्थिती शिक्षकांना कळावी यासाठी शिवानी यांनी तो रडण्याचा ऑडिओ रेकॉर्ड करून क्लास टीचरला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. मात्र, शिक्षकांकडून कोणतेही उत्तर आले नाही किंवा त्यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. हा एक वर्ष जुना व्हॉट्सअॅप चॅट आणि ऑडिओ आजही आईच्या फोनमध्ये सेव्ह आहे.
( नक्की वाचा : Mumbai News : मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये 'WWE'! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकाकडून डॉक्टरांना बेदम मारहाण, Video )
पालकांचा शाळेवर आरोप
आई शिवानी म्हणाल्या, "मी क्लास टीचर आणि क्लास कोऑर्डिनेटर यांच्याशी गेल्या एका वर्षात अनेक वेळा बोलले. पण त्यांनी एकतर हे टाळले किंवा दुर्लक्ष केले. वडील विजय मीना यांनी सांगितले की, एका PTM (पालक-शिक्षक बैठकीत) काही मुलांनी अमायरा आणि एका मुलाकडे बोट दाखवून थट्टा केली होती. तेव्हा अमायरा लाजेने त्यांच्यामागे लपली होती. विजय मीना यांनी शिक्षकांकडे तक्रार केली असता, शिक्षकांनी त्यांना 'हे को-एड (Co-ed) स्कूल आहे, अमायराने मुलांशी बोलायला शिकले पाहिजे' असे उत्तर दिले.
CCTV फुटेज मध्ये काय?
ज्या दिवशी अमायराने उडी मारली, त्या दिवशीच्या CCTV फुटेजमध्ये ती दोन वेळा शिक्षकांकडे जाऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पालकांनी सांगितले की, शिक्षकांनी त्यांना सांगितले की, अमायरा काही मुलांनी वापरलेल्या 'गलिच्छ शब्दांनी' आणि बुलिंगमुळे त्रस्त होती, ज्यात काही अशोभनीय हावभाव (Indecent Gestures) देखील होते.
CBSE च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार CCTV फुटेजमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग असणे आवश्यक असताना, या फुटेजमध्ये ऑडिओ नव्हता. तसेच, नियमानुसार कमीत कमी 15 दिवसांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवले पाहिजे.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात 'खाकी' ला डाग, थेट SP ऑफिसमध्येच लाच घेताना 'मॅडम' ना अटक )
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मायराचे काका साहिल यांनी शाळेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, "जेथे 5000 हून अधिक मुले शिकतात, तेथे 6 मजली इमारतीत सुरक्षा ग्रील (Grill) किंवा नेटशिवाय बांधकाम करण्याची परवानगी कशी मिळाली?"
पालक लवकरच अमायराला दुसऱ्या शाळेत (सेंट झेवियर्स) शिफ्ट करण्याच्या तयारीत होते आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक आमदार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, दुर्दैवाने वेळेत बदल शक्य झाला नाही.
प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
जयपूरचे डेप्युटी कमिश्नर (DCP) राजर्षि राज वर्मा यांनी सांगितले की, 'आम्ही प्रत्येक माहितीची नोंद घेऊन पडताळणी करत आहोत. पालकांना झालेल्या मानसिक धक्क्यामुळे त्यांच्याशी लगेच बोलता आले नाही, पण आता त्यांच्या सर्व मुद्यांची चौकशी केली जाईल.' तर, जिल्हा शिक्षण अधिकारी रामनिवास शर्मा यांनी सांगितले की, पोलीस उपस्थितीत पुढील 2-3 दिवसांत पालकांचे जबाब नोंदवले जातील, असे जिल्हा शिक्षण अधिकारी रामनिवास शर्मा यांनी स्पष्ट केले.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world