आरोपी अन् पोलिसांमध्ये तब्बल चार तास थरारनाट्य; मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी पोलीस दल हादरलं!

अवैध शस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेले उमर्टी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढविला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Jalgaon Crime : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या पूर्वसंध्येलाच अवघ्या महाराष्ट्र पोलीस दलाला हादरून सोडणारी घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अवैध शस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेले उमर्टी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करत त्याला तब्बल चार तास ओलीस ठेवले. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेत तब्बल चार तासाच्या थरार नाट्यनंतर ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चार तासाच्या थरार नाट्यानंतर ओलिस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर उमर्टी गावातील शस्त्र माफियांनी हल्ला केला होता. अवैध शस्त्र माफियांच्या हवेतील गोळीबारानंतर महाराष्ट्र पोलिसांनी देखील हवेतून गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं. मात्र या माफियांनी महाराष्ट्रातील शशिकांत पारधी या पोलीस अधिकाऱ्यांना ओलिस ठेवलं. अटक केलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अखेर मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ओलिस ठेवलेल्या पोलीस अधिकाऱ्याची सुटका करण्यात आली. 

नक्की वाचा - पाकिस्तानच्या जेलमध्ये 18 मच्छिमार, 4 वर्षांनंतर ही सुटका का नाही? यांना कुणी वाली आहे का?

अवैध शस्त्र माफियांच्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर शशिकांत पारधी असं ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या कर्मचाऱ्याचे महाराष्ट्राचे हद्दीतील उमर्टी येथून अपहरण करत मध्यप्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या उमर्टी गावात नेत्याला बांधून ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधत ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अटक केलेल्या आरोपीला अखेर अटक करून चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात आणलेच.

Advertisement